Fake Currency Racket: छ. संभाजीनगरच्या संतोषचं मोठं कांड, जालन्यात बनावट नोटांचा कारखाना, दृश्य पाहून सगळेच हादरले
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Fake Currency Racket: दुकानाचे शटर बंद करून संतोष दोन तासांत एक ते दीड लाख रुपये छापत होता. एक पेपर टाकून चार नोटा एकाचवेळी छापत होता.
जालना: बनावट नोटा प्रकरणात जालन्यात मोठी कारवाई झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचा एक तरुण केवळ दोन तासांत 3 लाख नकली नोटा छापत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बॉण्ड, फॉइल पेपर, शाई, कलर प्रिंटर, कटर आदी साहित्याचा वापर करून हुबेहूब 500 रुपयांच्या बनावट नोटांची निर्मिती सुरू होती. संतोष उत्तमराव कळसकर असे 37 वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याने आठ महिन्यांत 7 लाखांच्या बनावट नोटा छापल्या आहेत. कारवाईत 3 लाख 83 हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
आरोपी संतोष कळसकर हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून सध्या जय भवानीनगर इथे राहतो. त्याचे एपीआय कॉर्नर येथे विनायक ग्राफिक्स नावाचे दुकान आहे. संतोषने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा निर्मितीचे धडे घेतले. तो त्या नोटा संशयित शुभम खरात याच्या मदतीने इतर नागरिकांपर्यंत पोहोचवत होता. त्याच्या दुकानात सुरू असलेल्या गोरखधंद्यांचे बिंग फुटले असून, आधी मालेगाव पोलिसांनी, नंतर अंबड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी करून पुन्हा मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
advertisement
कशा बनवायचा 500 च्या नोटा?
दुकानाचे शटर बंद करून संतोष दोन तासांत एक ते दीड लाख रुपये छापत होता. एक पेपर टाकून चार नोटा एकाचवेळी छापत होता. ग्राफिक डिझायनर असलेला संतोष खऱ्या पाचशेच्या नोटांची कलर प्रिंटरच्या मदतीने बॉण्ड पेपरवर दोन्ही बाजूने प्रिंट काढायचा. एकाचवेळी तो चार नोटा तयार करत होता. फॉइल पेपर गरम करून तार तयार करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिलीये.
advertisement
18 हजारात 1 लाखांच्या नोटा
संतोष याची ओळख शुभम खरात याच्यासोबत झाली होती. शुभम खरात याच्यावर विश्वास ठेवून तो त्यालाच नोटा देत होता. इतर कोणालाही नोटा देत नव्हता. अठरा हजारांत एक लाखांच्या बनावट नोटा तो देत होता. त्याने आतापर्यंत 7 लाखांच्या नोटा छापल्या असून पोलिसांनी 3 लाख 85 हजार रुपये जप्त केले आहेत, असे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान नरोडे यांनी सांगितलं.
advertisement
आतापर्यंत 6 आरोपी जेरबंद, शुभम खरात फरार
अंबड पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी विकास अनिल गडगुळ (26, रा. अंबड), समरविरा सुनील खरात (21, रा. अंबड), आकाश नारायण शेळके (19, रा. जालना), आदित्य अमित गायकवाड (रा. पैठण), संतोष उत्तमराव कळसकर (37 रा. जयभवानी नगर, छत्रपती संभाजीनगर) व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे. तर नोटा पुरवणारा शुभम गोरख खरात (रा. अंबिका नगर, छत्रपती संभाजीनगर) हा फरार असून, त्याच्या मागावर पोलिस आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Fake Currency Racket: छ. संभाजीनगरच्या संतोषचं मोठं कांड, जालन्यात बनावट नोटांचा कारखाना, दृश्य पाहून सगळेच हादरले








