'4 नगरसेवक हरवले आहेत', ठाकरे गट पोलिसांत करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) उद्धवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) उद्धवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धवसेनेचे निवडून आलेल्या ११ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक सध्या 'नॉट रिचेबल' असून, ते विरोधी गटांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, हे नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देणार असल्याचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी जाहीर केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धवसेनेच्या एकूण ११ नगरसेवकांपैकी २ नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, तर २ नगरसेवक राज ठाकरे यांच्या 'मनसे'च्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मधुर म्हात्रे यांनी अलीकडेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. म्हात्रे यांना सुरुवातीला शिंदेसेनेने उमेदवारी नाकारली होती, त्यानंतर त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला होता. मात्र, आता पुन्हा ते जुन्या पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
दुसरीकडे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे दोन नगरसेवक उद्धवसेनेच्या गट स्थापनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला अनुपस्थित होते. त्यांनी मनसेला पाठिंबा दिल्याचे समजते. दोघंही मूळचे मनसेचे आहेत. मात्र त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढली होती.
या सगळ्या घडामोडींवर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. "हे ४ नगरसेवक नेमके कुठे आहेत, हे कोणालाही ठाऊक नाही. ते कदाचित मनसे किंवा शिंदेसेनेच्या ताब्यात असावेत. आम्ही आणखी एक दिवस त्यांची वाट पाहू आणि जर ते समोर आले नाहीत, तर ते हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करू," असा इशारा भोईर यांनी दिला आहे. भोईर यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात आता पोलिसांची एन्ट्री होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:10 AM IST








