भिंती कोरड्या अन् गाभाऱ्यात घुसतं नदीचं पाणी, राज्यातील अनोखं मंदिर पाहिलंत का?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
राज्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागली की खोल खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरते.
कोल्हापूर, 3 ऑगस्ट: प्राचीन आणि अध्यात्मिक वारसा लाभलेले शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. या ठिकाणची अनेक मंदिरे ही त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात. त्यातीलच एक म्हणजे स्वयंभू खोल खंडोबा मंदिर होय. या मंदिरात निसर्गाचा अजून एक चमत्कार पाहायला मिळतो. कोल्हापुरात पावसाळ्याच्या दिवसांत नदीला पाणी वाढू लागले की, या मंदिराच्या देखील गाभाऱ्यात पाणी साठायला सुरुवात होते.
खोल खंडोबा प्राचीन मंदिर
इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून परदेशात व्यापार असणारी करवीर नगरी हे एक प्राचीन ठिकाण आहे. याबाबतचे पुरावे ब्रह्मपुरी येथे झालेल्या उत्खननात मिळून आलेले आहेत. हे ऐतिहासिक कोल्हापूर शहरच खरंतर खेड्यांपासून निर्माण झाले आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीत पूर्वी सहा लहानलहान खेडी होती. ही खेडी नदीकाठी अथवा पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्याकाठी वसवली गेली होती. ही सहा खेडी म्हणजेच ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर ही होती. ही खेडी लहान होती, पण स्वतंत्र होती, यापैकी ब्रह्मपुरी ही सर्वात जुनी वसाहत होय. या प्रत्येक खेड्यांचे स्वतंत्र ग्रामदैवतही होते. त्यापैकीच एक असलेल्या खोलखंडोबा या परिसराचे दैवत म्हणजे हे खोल खंडोबा मंदिर आहे, अशी माहिती मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
advertisement
अशी आहे मंदिराची रचना
महादेवाचे हे स्वयंभू मंदिर असून भगवान शंकराच्या लिंगाच्या रुपात खंडोबा अर्थात देव मल्हार गाभाऱ्यात आहेत. मंदिर हे पुरातन असून पुढे असणारा सभामंडप नंतर बांधण्यात आला आहे. मंदिराचा गाभारा हा जमिनीपासून 20 ते 25 फूट खोलीवर आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी एकूण 17 पायऱ्या उतरुन जावे लागते. त्यापैकी पंधरा पायऱ्यात दगडात घडवण्यात आल्या आहेत. खाली गेल्यावर समोरच शंकराची मोठी पिंड आहे. हे मंदिर मूलतः भगवान शंकराचे असल्याने पिंडीच्या मागे पार्वतीचे देखील एक शिल्प याठिकाणी पाहायला मिळते. मंदिराचा कळस हा घुमटाकार आहे त्यामुळे गाभाऱ्यात आवाज घुमतो. सभामंडपात नंदी आणि कासवाची शिल्पे आहेत. तसेच गाभाऱ्याच्या अगदी समोर गाभाऱ्याकडेच तोंड करून बाणाई देवीचे देखील एक शिल्प या ठिकाणी सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूला आहे. तर या मंदिराचे काही अवशेष त्याच्या शेजारी ठेवण्यात आले आहेत.
advertisement
गाभाऱ्यात साठते पाणी
खोल खंडोबा हे मंदिर पावसाळ्यात हळूहळू पाण्याने भरु लागते. ज्यावेळी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होते, त्यावेळी हळूहळू या मंदिराच्या गाभाऱ्यात देखील भूगर्भातून पाणी येऊन गाभारा पाण्याने भरून जातो. पूर्वी हा गाभारा पाण्याने भरला की नदीला पूर आल्याचे संकेत मिळत असत. मात्र सध्या वाढलेल्या मानवी वस्तीमुळे आणि भूगर्भातील बदलांमुळे या मंदिराच्या ठिकाणची भूगर्भ पाणीपातळी उंचावली आहे, असे भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितल्याची माहिती मंदिराचे पुजारी मेघश्याम जगताप यांनी दिली आहे. या मंदिराची सेवा करणारी त्यांची सध्याची आठवी पिढी आहे.
advertisement
मंदिराचा घुमटाकार कळस
या मंदिराचे घुमटाकार कळस हेही येथील एक वैशिष्ट्य आहे. याला बाजूने पळसाच्या पानांची नक्षी कोरण्यात आली आहे. तर मुघलांकडून झालेल्या अनेक आक्रमणांवेळी हिंदू मंदिरांना वाचवण्याचे बरेच प्रयत्न त्यावेळी झाले होते. तेव्हा या मंदिराला वाचवण्यासाठी देखील मंदिराचा कळस इस्लामी पद्धतीचा घुमटाकार बनवण्यात आला असावा, असेही मेघश्याम जगताप यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, नदीची पाणी पातळी वाढली की या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग पूर्णपणे पाण्यात जाते. तर पाणी पातळी कमी आले की गाभाऱ्यातील पाणी कमी येते. या अनोख्या बाबीमुळे या मंदिराला विशेष महत्त्व असून या ठिकाणी चंपाषष्ठी उत्सव, दसऱ्यातील उत्सव साजरे केले जातात. तर श्रावणामध्ये या मंदिरात खास पूजा बांधली जाते. दर श्रावण सोमवार आणि रविवारी दहीभात लिंपण करून विशेष पूजा बांधून वाघ्या मुरळीचे कार्यक्रम देखील मंदिरात पार पाडत असतात.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 03, 2023 12:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
भिंती कोरड्या अन् गाभाऱ्यात घुसतं नदीचं पाणी, राज्यातील अनोखं मंदिर पाहिलंत का?