भाणोरा वाजवून केली जाते गौराईची कान उघडणी, कोल्हापुरातील नेमकी ही परंपरा आहे तरी काय, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
श्रावणामध्ये खेळलेले मंगळागौरीचे खेळ हे गणेशोत्सवात देखील खेळले जातात. पण यात थोडे वेगळेपण जपले जाते. यात धानोरा वाजवण्याचा विशेष उल्लेख केला जातो.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : शहर असो किंवा ग्रामीण भाग, गौरी-गणपतीचा सण म्हणजे, उत्साहाला उधाण असो, बाप्पांच्या आगमनाची वाट आतुरतेन जशी तरूण मुले पाहत असतात अगदी तशीच घरातील गृहलक्ष्मी गौराईची वाट पाहते. गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौराई माहेरी येते. माहेरी आलेली लेक असल्याप्रमाणेच तिचे लाड केले जातात. गौराईला नवी साडी चोळी करतात. ग्रामीण भागात तर आजही नागपंचमीपासूनच गौराईच्या गाण्यांचा फेर धरला जातो. गौराईची गाणी, झिम्मा फुगडीचे खेळ रात्रभर चालतात. गौराईच्या जागरणादिवशी तर पहाटे पर्यंत हे खेळ रंगतात आणि गौराईच्या दर्शनाने मग खेळांची समाप्ती होते.
advertisement
या खेळांमध्ये विविध प्रकारे गौराईला जागवल जाते. पण अलीकडे वाढलेल्या पाश्चात्य संस्कृतीमुळ यातील काही परंपरा लुप्त होत चालल्या आहेत. आज आपण लोकल18 च्या माध्यमातून अशाच एका प्रथेची माहिती घेणार आहोत, जी काही अंशी लुप्त होत चालली आहे. मात्र, आजही कोल्हापुरातल्या काही ग्रामीण भागासह शहरी भागात ती परंपरा जपली जाते त्यापैकीच एक म्हणजे भानोरा वाजवणे ही परंपरा आहे. याला बोली भाषेत काही जण घाणेरा वाजवणे असेही म्हणतात.
advertisement
कोल्हापूरच्या काही भागात गौरी पूजनावेळी गौराईच्या कान उघडणीची एक प्रथा दिसून येते ती म्हणजे भाणोरा वाजवणे हे आहे. कोल्हापुरात ग्रामीण भागासह शहरी भागात ही परंपरा भक्तीभावाने करण्यात येते. ही पद्धत नेमकी काय असते, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
गौराईची कान उघडणी म्हणजे काय?
श्रावणामध्ये खेळलेले मंगळागौरीचे खेळ हे गणेशोत्सवात देखील खेळले जातात. पण यात थोडे वेगळेपण जपले जाते. यात धानोरा वाजवण्याचा विशेष उल्लेख केला जातो. गौरीच्या जेवणा दिवशी रात्री बाराच्या सुमारास गौर परत जाते, अशी आख्यायिका आहे. यामध्ये परातीचा वापर केला जातो. ही परात पायाखाली घेतली जाते आणि या परातीवर उलातन, लाटणं किंवा रवीचा वापर केला जातो. यापूर्वी उलट्या केलेल्या परातीवर राख टाकली जाते आणि लाटण्याच्या किंवा रवीच्या सहाय्यान या परातीवर घासून आवाज काढला जातो. परंपरेनुसार ही क्रिया करत असताना सोबतच्या साथीदार या गौराईची गाणी म्हणत असतात. या आवाजामुळे काही जणींच्या गौराई अंगात येते, अशी मान्यता आहे.
advertisement
कान उघडणी का केली जाते?
गणेशोत्सवात गणपती विराजमान झाल्यानंतर गौराईचा आगमन होते. थोडक्यात गौराई ही माहेरवाशीन होते. माहेरवाशीण झाल्यानंतर सासरच्या कामापासून विश्रांती मिळण्यासाठी ती झोपी जाते. या गौराईला जाग ठेवण्यासाठी ही विशिष्ट क्रिया केली जाते, थोडक्यात कान उघडणी करणे अशी मान्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापुरातल्या काही शहरी भागासह ग्रामीण भागात ही प्रथा महिलांकडून राबवली जाते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 12, 2024 6:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
भाणोरा वाजवून केली जाते गौराईची कान उघडणी, कोल्हापुरातील नेमकी ही परंपरा आहे तरी काय, VIDEO