'अन्नदान हेच श्रेष्ठ दान'! रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतो रोज मोफत भोजनाचा लाभ, कोल्हापुरात कसा चालतो स्तुत्य उपक्रम? 

Last Updated:

रोजच्या रोज मोफत अन्नदानाचे काम कोल्हापुरातील काहीजण एका मुंबईच्या संस्थेच्या मदतीने करत आहेत.

+
News18

News18

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : असे म्हणतात की, भुकेल्याला अन्नदान केल्यास पुण्य लाभते. पोटात अन्न गेल्यानंतर आपसूकच त्यांच्या तोंडून देणाऱ्यासाठी शुभाशिर्वाद निघत असतात. तर रोजच्या रोज मोफत अन्नदानाचे काम कोल्हापुरातील काहीजण एका मुंबईच्या संस्थेच्या मदतीने करत आहेत. कोल्हापूरच्या छ्त्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात हे अन्नदान केले जाते. दररोज अन्नदान सुरु होण्याआधीच या ठिकाणी गरजू लोक वाट पाहत थांबलेले असतात.
advertisement
कोल्हापुरातील सीपीआर जिल्हा रुग्णालयाला थोरला दवाखाना म्हणूनच ओळखले जाते. हे दवाखान्यात जिल्हा त्याचबरोबर आसपासच्या भागातील देखील रुग्ण उपचारासाठी येत असतात. बरेचसे रुग्ण आहे ग्रामीण भागातील असल्यामुळे कित्येकांच्याकडे चहा- नाश्ता करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आलेल्या कोल्हापूरच्या राहुल कदम यांनी ही सगळी परिस्थिती जवळून बघितली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या माऊली सोशल सर्कलच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2022 पासून दर शनिवार, रविवार असे आठवड्यातून दोन दिवस सीपीआर रुग्णालय परिसरात मोफत अन्न वाटप सुरु केले होते. मात्र हळूहळू पुढे  येऊ लागलेल्या अडचणींमुळे त्यांना हा जनता भोजनचा उपक्रम थांबवण्याची वेळ आली. पण त्यावेळी मुंबईच्या विथ आर्या या संस्थेने त्यांना मदत केली. तेव्हापासून आजतागायत आठवड्यातून दोन दिवस चालणारा जनता भोजनचा उपक्रम आता दररोज सुरू असतो अशी माहिती राहुल यांचा भाऊ दीपक कदम यांनी दिली आहे.
advertisement
कोल्हापुरात रोज मोफत मिळतो 200 जणांना लाभ
दोन घास या विथ आर्या संस्थेच्या उपक्रमांर्गत माऊली सोशल सर्कल 2023 पासून रोज दुपारच्या वेळी मोफत जेवण वाटप करत आहे. यामध्ये सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, लहान मुले, त्याचबरोबर कधीकधी स्वतः रुग्ण देखील या उपक्रमाचा लाभ घेतात. विथ आर्याच्या माध्यमातून रोज बाराशे डब्यांच्या माध्यमातून लोकांना जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालय परिसरात हा उपक्रम रोज राबविला जातो. तसेच कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय परिसरात रोज 200 डबे वाटप केले जातात. यामध्ये रोज वेगवेगळे व्हेज पुलाव आणि एक केळ असा हा आहार असतो, असेही दीपक कदम यांनी सांगितले आहे.
advertisement
काय काम करते विथ आर्या?
मुंबईस्थित विथ आर्या (WithAARYA) ही संस्था गरजूंसाठी महाराष्ट्रभर काम करते. शितल भाटकर आणि विक्रांत भाटकर यांनी त्यांचा 7 वर्षांचा मुलगा आर्या भाटकर याच्या स्मरणार्थ ही संस्था स्थापन केली आहे. त्याला निमन-पिक 'सी' नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने ग्रासले होते. ही संस्था अशाच प्रकारच्या दुर्मिळ विकारांनी ग्रस्त मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक तसेच नैतिक दृष्ट्या मदत करते. ही संस्था महाराष्ट्रभर दुर्मिळ अनुवांशिक लाइसोसोमल डिसऑर्डरबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शौर्य उपक्रम, जिल्हा रुग्णालयात रुपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाचा दोन घास हा उपक्रम त्याचबरोबर चाय की चुस्की, दवा दान आणि आश्रय असे उपक्रम राबवते.
advertisement
दरम्यान हा अन्नदानाचा उपक्रम अजूनही वाढवण्याची इच्छा आहे. रोज दुपारसोबतच रात्री देखील मोफत भोजन वाटप करता येऊ शकते. त्यासाठी नागरिकांकडून माऊली सोशल सर्कलला मदत मिळावी, असे आवाहन देखील दीपक कदम यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
'अन्नदान हेच श्रेष्ठ दान'! रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतो रोज मोफत भोजनाचा लाभ, कोल्हापुरात कसा चालतो स्तुत्य उपक्रम? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement