Shaktipeeth Highway : 'पैसे खाता यावे यासाठी हा..' शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी आक्रमक, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Shaktipeeth Highway : एका समृद्धी महामार्गामुळे एका आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आता शक्तिपीठ महामार्गात कोणाला शक्ती मिळणार? असा टोला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
कोल्हापूर, (ज्ञानेश्वर सोळोखे, प्रतिनिधी) : “आम्ही विकासाला कधीच विरोध केला नाही, पण सरकार आमच्या अंत्यविधीची व्यवस्था करून विकास करत आहे आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा आरोप शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही, अशी आमची भूमिका आहे, असे म्हणत शक्तिपीठ महामार्गला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे.
शक्तिपीठ महामार्गविरोधात राजू शेट्टी आक्रमक
राजू शेट्टी म्हणाले, 18 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्ग विरोधात प्रचंड मोर्चा काढण्याचा आज निर्णय झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी, भाविकांसाठी नाही. तर राजकीय नेत्यांना समृद्धी महामार्गासारखा अधिक समृद्ध करण्यासाठी हा महामार्ग आहे. ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग नियोजित केलेला आहे, ते कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूर, तुळजापूर, परळी वैजनाथ या कुठल्याही देवस्थानला जात असताना ट्रॅफिक जाम झालेला नाही. आपत्कालीन परिस्थिती देखील असं काहीही झालेलं नाही. उलट आता सांगली ते उस्मानाबाद हा महामार्ग आहे. त्याच्यावर दोन ते तीन टोलनाके आहेत, त्यामध्ये अपेक्षित टोल वसूल होत नाही. याचा अर्थ त्याच महामार्गावर अपेक्षित वाहतूक नाही. मग महामार्ग नवीन काढायची काय गरज आहे? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
advertisement
नवीन महामार्ग काढायचं त्याच टेंडर काढून पैसे खाता यावे यासाठी हा महामार्ग आहे का? समृद्धी महामार्गाने आमदारांची किंमत 50 कोटी केली. तर शक्तिपीठांना किती शक्ती मिळणार आहे? आणि कोणाची किंमत किती होणार आहे? असे प्रश्न उपस्थित करत आम्ही हे होऊ देणार नसल्याचा पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.
दुष्काळावरुन राजू शेट्टी यांची सरकारवर टीका
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. जनावरांना चारा मिळत नाही. वेळेवर मान्सून आला तरीही ही परिस्थिती पुढील दोन महिन्यांपर्यंत राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची ही समस्या आहे. अशा परिस्थितीत कोणाला काहीही त्याचं गांभीर्य नाही. सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते. जनावरं चाऱ्यासाठी टाहो फोडत आहेत. सरकार काहीच करायला तयार नाही ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केली.
advertisement
राजापूरचं पाणी चोरी का होतंय?
महाराष्ट्राचे पाणी वेगळं आणि कर्नाटकचे पाणी वेगळं आहे. त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना दिलेला असताना ते जर आपलं पाणी अशा पद्धतीने घेत असतील मग सरकार काय करते? सरकारने वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे. कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात सरकार नेभळटपणा दाखवत आहे. त्यामुळे कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 25, 2024 7:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Shaktipeeth Highway : 'पैसे खाता यावे यासाठी हा..' शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी आक्रमक, म्हणाले..







