Latur Water Crisis : लातूरमध्ये पाणीप्रश्न पेटला! BDO कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur Water Crisis : लातूर जिल्ह्यातील हणमंत जवळगा येथील पाणी टंचाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे.
लातूर : लातूर जिल्ह्यातील हणमंत जवळगा (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडून दूरध्वनीद्वारे याबाबतच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच या गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
हणमंत जवळगा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची जलवाहिनी काही व्यक्तींनी फोडल्याने हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालय येथे आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच हणमंत जवळगा गावातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या, तसेच असे प्रकार पुन्हा होवू नयेत, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
advertisement
साठवण तलावातुन होणारा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थ आक्रामक
गेल्या पंधरा दिवसांपासून बंद झालेला गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी चाकुर तालुक्यातील हणमंतजवळगा गावाचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाला या मागणीचे निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष असल्याने शुक्रवारी चाकुर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पाच ते सहा व्यक्तींनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या हातातील डिझेलच्या बाटली काढून घेतल्या. यावेळी गावातील महिला आणि पुरुषांचा जमाव कार्यालयाबाहेर पाणी द्या, या मागणीच्या घोषणा देत होता.
advertisement
दरम्यान, हणमंतजवळगा गावाला हिंपळनेर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. हिंपळनेर येथील काही व्यक्तींनी या पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवरील मोटारी व पाईपलाईची नासधूस केली असून, यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून गावाचा पाणीपुरवठा बंद झालाय. गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, पाणीपुरवठा योजनेवरील मोटारी आणि पाईपलाईनची नासधूस करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
May 25, 2024 8:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Water Crisis : लातूरमध्ये पाणीप्रश्न पेटला! BDO कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल





