तळीरामांची सोय? मतदानाच्या आदल्या रात्री दारुला पूर, 110 पेट्या पकडल्या; नागपूरात मोठी कारवाई
- Reported by:Uday Timande
- Published by:Prachi Amale
Last Updated:
झोपडपट्टीत वाटण्यासाठी किंवा निवडणुकीदरम्यान वापरण्यासाठी मनसेच्या उमेदवाराने ही दारू आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. निवडणूक म्हटले तर दारुचा महापूर वागणार यात शंकाच नाही, कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी सुरुवात झाल्याचे चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळाले आहे. नागपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल देशी दारूच्या 110 पेट्या पकडल्याचा दावा केला असून या प्रकरणाचा तपास सध्या धंतोली पोलीस करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाडी येथील मनसे कार्यालयाजवळ एक संशयास्पद गाडी उभी असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर या गाडीचा पाठलाग करण्यात आला. नागपूरच्या गजानननगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नरेंद्र नगर पुलाजवळ संबंधित गाडीने एका कारला धडक दिली. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला.
नेमकं काय घडलं?
या अपघातानंतर स्थानिक भाजप कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले असता, सदर गाडी देशी दारूच्या पेट्यांनी भरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये 110 देशी दारूच्या पेट्या आढळून आली. प्राथमिक तपासात ही दारू नागपूरहून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे नेली जात असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत. झोपडपट्टीत वाटण्यासाठी किंवा निवडणुकीदरम्यान वापरण्यासाठी मनसेच्या उमेदवाराने ही दारू आणल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भात मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
काय कारवाई होणार?
पोलिस तपासात महत्त्वाचा मुद्दा समोर आला असून, संबंधित गाडीच्या मालकाकडे दारू वाहतुकीसाठी अधिकृत बिल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही वाहतूक कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या ही गाडी धंतोली पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, पोलीस तपासातून काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 9:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तळीरामांची सोय? मतदानाच्या आदल्या रात्री दारुला पूर, 110 पेट्या पकडल्या; नागपूरात मोठी कारवाई









