गुन्हा दाखल झाल्यावर मनोज जरांगे आक्रमक, धनंजय मुंडे तू मला खेटून चूक केलीये, आता...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manoj Jarange Patil: परळीत गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांनीही संघर्षाची भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली.
अंतरवाली सराटी, जालना : मयत संतोष देशमुख यांच्या भावाला बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने धमकी दिली म्हणून मी परभणीच्या भाषणात त्यांना ताकीद दिली, मी वंजारी समाजाबद्दल बोललो नाही, बोलणार नाही. पण त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करून आणि मला खेटून चूक केली. आता यांची संपूर्ण प्रकरणे काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, असे आरोप ठेवून परळी शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. परभणीच्या सभेत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. रविवारी सायंकाळी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
advertisement
धनंजय मुंडे यांनी कुख्यात गुंडगिरीचे संघटन उभे केले, वेळ आली की ओबीसी म्हणायचे
परळीत गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांनीही संघर्षाची भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. तुम्ही आमची माणसं मारली तरी आम्ही गप्प बसायचं का? धनंजय मुंडे यांनी कुख्यात गुंडगिरीचे संघटन उभे केले आहे. आपल्यावर वेळ आली की ओबीसी म्हणायचे, ही कुठली पद्धत? तुम्ही आरोपींना साथ द्यायला लागलेला असताना आम्ही कसे शांत बसायचे? गुन्हा दाखल करण्याची इतकी तत्परता तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात का दाखवली नाही? हे सगळे धनंजय मुंडे घडवून आणतो आहे. आम्हाला संपविण्याचा मुंडेंचा विचार आहे की काय? असे एकमागून एक सवाल जरांगे यांनी विचारले.
advertisement
धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे सगळे खंडणीचे लाभार्थी
आम्ही कोणत्याही एका जातीला लक्ष्य करीत नाही. आम्ही वंजारींना न बोलता त्यांच्या गुंडगिरीला बोललो. जे बोलत आहेत, ते सगळे खंडणीचे लाभार्थी आहेत. न्याय द्या बोललो म्हणून मी जातीयवादी होत असेल तर होय मी जातीयवादी आहे. धनंजय मुंडेंना जातीय तेढ निर्माण करायची आहे. तो मला खेटलाच आहे तर त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिदे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
advertisement
धनंजय मुंडे यांना एकेरी भाषेत सुनावले
धनंजय मुंडे, तू मला खेटून चूक करतो आहे. एवढा जातीयवाद धनंजय मुंडेंनी करायला नको होता. चुकीची पावलं धनंजय मुंडे यांनी आणखी तरी उचलू नयेत. तो जर गप बसला नाही तर मी त्याचे पूर्ण प्रकरणे बाहेर काढीन, असा इशाराही जरांगे यांनी दिला. ओबीसीच्या नेत्याला आमच्या विरोधात बोलायला लावून धनंजय मुंडे खोलात चालला आहे. आमच्याविरोधात आंदोलने करायला लावणे हे चांगले नाही. आंदोलनाच्या नावाखाली तू गुंडगिरी सुरू केली आहे. हे सगळं तू घडवून आणू लागला आहेस. तू खिचडी होणार, तू मला खेटायला नको होते, अशा एकेरी शब्दात जरांगेंनी मुंडे यांना सुनावले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस, बीडमधली गुंडगिरी संपवा
आम्ही आमच्या लेकरासाठी,त्याच्या न्यायासाठी भांडतो आहोत. धनंजय मुंडे आरोपीला साथ देत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, आपण हे लवकरात लवकर संपवले पाहिजे. आमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही संघटीत गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे, अशी विनंतीही जरांगे यांनी फडणवीस यांना केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 06, 2025 3:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुन्हा दाखल झाल्यावर मनोज जरांगे आक्रमक, धनंजय मुंडे तू मला खेटून चूक केलीये, आता...









