'धनंजय मुंडेंनीच सुपारी दिली, तिन्ही आरोपींची कबुली', मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिली होती, याचा जबाब आरोपींनी दिल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. अलीकडेच मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केला होता. जरांगे यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंचा दावा फेटाळून लावला होता. तसेच आपली नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
आता या सगळ्या घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिली होती. अशी कबुली अटकेतील तिन्ही आरोपींनी दिली आहे. मात्र पोलीस यंत्रणांकडून धनंजय मुंडेंची चौकशी केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली, असा आरोप जरांगे यांनी केला.
advertisement
हत्येच्या कटाबद्दल मनोज जरांगे म्हणाले की, मी चांगलं काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. असं असतानाही जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृशोक झाल्याने, त्यांचे सांत्वन करण्यासाठी जरांगे पाटील पुण्याच्या चाकणमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप केले."
advertisement
आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, मी सरकारचं पोलीस संरक्षण नाकारलं आहे. मात्र, मला संपवण्याचा कट रचला जात आहे. पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली नसती, तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी नाव घेतलं आहे. नार्को टेस्टची मागणी करणारे आता कुठे गेले? त्यांनी पुढे येऊन आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करावी. या प्रकरणाचे पुढच्या काळात वाईट पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 7:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'धनंजय मुंडेंनीच सुपारी दिली, तिन्ही आरोपींची कबुली', मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा


