पंकजा मुंडे यांचा पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अतिशय मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pankaja Munde: पशुसंवर्धन विभागांतर्गत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीन हजार पेक्षा जास्त पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.
मुंबई: मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे.
समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही दि. १५ व १६ मे २०२५ रोजी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना केल्यानंतर काही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकत्रित पशुसंवर्धन विभागांतर्गत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीन हजार पेक्षा जास्त पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले असून नजिकच्या काळात सदर पदे भरली जाणे अभिप्रेत आहे.
advertisement
पारदर्शक कारभार आणि पसंतीनुसार बदल्या
पशुसंवर्धन विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा, यासाठी पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील प्राधान्याने भरावयाची पदे निश्चित करण्यात आली आहेत. या पदांवर बदलीने पदस्थापना करण्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली देण्यासाठी समुपदेशनाची कार्यपध्दती अवलंबण्यात येणार आहे. त्याव्दारे बदलीपात्र अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम व जेष्ठतेनुसार उपलब्ध पदांमधून त्यांच्या पसंतीचे ठिकाण निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.
advertisement
समुपदेशनाने बदलीची कार्यपध्दती पार पाडताना ती पारदर्शकपणे पार पाडली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामध्ये बदलीसाठी निर्धारित करण्यात आलेली पदे, दिव्यांग, गंभीर आजार असलेले कर्मचारी, असक्षम पाल्य, विधवा किंवा परित्यक्ता असलेल्या महिला, पती-पत्नी एकत्रिकरण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांची वर्गवारीनिहाय जेष्ठता यादी व बदलीसाठी उपलब्ध पदे यांची यादी विभागाच्या पशुसंवर्धन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची लिंक सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर वर्गवारीतील जेष्ठ अधिकाऱ्यांस बदलीचे ठिकाण निवडण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडे यांचा पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अतिशय मोठा निर्णय