Thane News: बाप्पाच्या निर्माल्यातून मिळणार वृक्षांना जीवनदान, ठाण्यात पर्यावरणपूरक उपक्रम
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane News: गौरी व गणपतींच्या विसर्जनावेळी उल्हास नदीकाठी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते.
ठाणे: अनंत चतुर्दशीच्या दिवशी (6 ऑगस्ट) गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ठाण्यात देखील लाखो घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन पार पडलं. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला. विसर्जनावेळी जमा होणाऱ्या निर्माल्याचा वापर करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे सरसावलं आहे. गणपती विसर्जनावेळी उल्हास नदी किनारी हा उपक्रम राबवण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी व गणपतींच्या दीड, पाच आणि सात दिवसांच्या विसर्जनावेळी उल्हास नदीकाठी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य नदीत टाकले जाते. गणेशोत्सवानंतर नदीत सोडल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे उल्हास नदीच्या प्रदुषणात वाढ होते. हे टाळण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांनी विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबवला गेला.
advertisement
प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकलित केलेलं निर्माल्य वेगळं करून त्यातील फुलांचा वापर करून कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे. हे खत प्रतिष्ठानने शहरात केलेल्या वृक्षारोपणासाठी वापरलं जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उल्हास नदीचं प्रदुषण मोठ्या प्रमाणात वर्षात वाढलं आहे. नागरी सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींतील सांडपाणी उल्हास नदीत सोडलं जातं. त्यामुळे उल्हास नदीत दरवर्षी जलपर्णी जमा होतात आणि या जलपर्णींमुळे पाण्याची पातळी खालावते. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत आहे. विसर्जन घाटांवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांनी शेकडो भाविकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्यास प्रवृत्त केलं, याबाबत भाविकांनीही समाधान व्यक्त केलं.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News: बाप्पाच्या निर्माल्यातून मिळणार वृक्षांना जीवनदान, ठाण्यात पर्यावरणपूरक उपक्रम