advertisement

बापासाठी लेक झाली 'देवदूत'! आमदार विजय शिवतारे यांना लेकीने केली किडनी दान

Last Updated:

पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासाठी त्यांची लेक डॉ. ममता शिवतारे या साक्षात देवदूत बनून धावून आल्या आहेत.

News18
News18
पुणे :   बाप लेकीचं नातं अनोखं असतं. आपली लेक ही बापासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. दोघांचाही एकमेकांवर अफाट जीव असतो. वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे 'हिरो'च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. याच ओळी खऱ्या करुन दाखवणाऱ्या आज असंख्य तरुणी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आधार देत आहेत अशीच एक हृदयस्पर्शी घटना पुरंदरमधून समोर आली आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना मुलीने किडनी देत वडिलांना जीवदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासाठी त्यांची लेक डॉ. ममता शिवतारे या साक्षात देवदूत बनून धावून आल्या आहेत. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केली असून या दातृत्वामुळे महाराष्ट्रातील लेकीच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. डॉ. ममता यांचे सर्वत्र कौतुक होत असून हे फक्त एक कन्याच करू शकते. मुलगीत वंशाचा दिवा चालवू शकते, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया संपूर्ण पुरंदरमधून व्यक्त होत आहेत.
advertisement

मुंबईत पार पडली शस्त्रक्रिया 

आमदार विजय शिवतारे गेल्या अनेक महिन्यांपासून किडनी विकाराने त्रस्त होते. प्रकृती खालावत चालल्याने त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते. अशा कठीण प्रसंगी पित्याचे दुःख न पाहवल्याने डॉक्टर असलेल्या ममता यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जन्मदात्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. विजय शिवतारे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने संपूर्ण शिवतारे कुटुंब चिंतेत होते. किडनी ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरला होता. अशा वेळी डॉ. ममता यांनी केवळ एक डॉक्टर म्हणून नाही, तर एक कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून पुढाकार घेतला आणि शस्त्रक्रियेसाठी स्वतःला तयार केले. मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement

पुरंदरच्या लेकीचं कौतुक 

ममता शिवतारे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलाला महत्त्व दिले जाते, अशा काळात ममता शिवतारे यांनी लेकीचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. पुरंदरच्या मातीतील या लेकीने दाखवलेले हे धाडस आणि प्रेम पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बापासाठी लेक झाली 'देवदूत'! आमदार विजय शिवतारे यांना लेकीने केली किडनी दान
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement