Mumbai Goa Highway: गाडी चालवायला धड रस्ता नाही, पण खिसा रिकामा करायला टोल नाके तयार! मुंबई-गोवा महामार्गावर बसणार टोलचा झटका
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Goa Highway Toll: १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, सरकारने प्रवाशांच्या खिशावर 'टोल'चा भार टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे.
मुंबई: कोकणवासीयांसाठी लाइफलाइन ठरणार असलेला मुंबई-गोवा महामार्ग गेल्या दीड दशकापासून रखडलेला आहे. आता कुठे १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, सरकारने प्रवाशांच्या खिशावर 'टोल'चा भार टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच पथकर नाके सुरू करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, येत्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी होणार आहे.
काम अपूर्ण, पण वसुलीची घाई?
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील (पळस्पे ते इंदापूर) कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. निधीची कमतरता, भूसंपादनाचे अडथळे आणि कंत्राटदारांची निष्क्रियता यामुळे हे काम तब्बल १५ वर्षे रखडले. सध्या नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. असे असतानाही, रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे कोकणवासियांमध्ये संतापाची लाट आहे.
advertisement
तुमच्या खिशाला कुठे लागणार कात्री?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी टोल भरावा लागणार आहेत. यामध्ये खारपाडा (पेण जवळ) आणि खांब (रोहा जवळ) या दोन ठिकाणी टोल असणार असल्याचे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'ने दिले आहे.
या दोन्ही ठिकाणी टोल नाक्यांच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. इतकेच नाही, तर दुसऱ्या टप्प्यात पोलादपूरजवळील लोहारे येथेही टोल नाका उभारला जाणार आहे. टोलचे नेमके दर अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पुढच्या ७ दिवसांत प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेनंतर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागतील, याचे चित्र स्पष्ट होईल.
advertisement
खड्डे दिले, आता टोलही...कोकणवासीयांचा सवाल
गेल्या १५ वर्षांत या महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले, कित्येकांना जीव गमवावा लागला. इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर, आता रस्ता पूर्ण होण्याआधीच टोलची वसुली करणे हा अन्याय असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. मे अखेरपर्यंत रस्ता पूर्ण होण्याचा अंदाज असला, तरी त्याआधीच टोलचे 'बॅरियर' प्रवाशांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत.
advertisement
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रविंद्र इंगुले यांनी सांगितले की, महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. टोल नाके आठवड्याभरात कार्यान्वित केले जाऊ शकतात. त्याचा दर मात्र टोलची अधिसूचना निघाल्यावर स्पष्ट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Location :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Goa Highway: गाडी चालवायला धड रस्ता नाही, पण खिसा रिकामा करायला टोल नाके तयार! मुंबई-गोवा महामार्गावर बसणार टोलचा झटका








