शेतकरी संघटनेतील बडा नेता शिंदेसेनेत, एकनाथ शिंदे यांना अत्यानंद, नांदेडची गणितं बदलणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एकनाथ शिंदे यांनी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.
मुंबई : लोहा-कंधारचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या सोहळ्यात हा पक्षप्रवेश पार पडला.
एकनाथ शिंदे यांनी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. मराठवाड्यात विशेषतः नांदेड जिल्ह्यात शेतकरी संघटनांमध्ये प्रभाव असलेले नेतृत्व थेट सत्ताधारी पक्षात सामील झाल्याने ग्रामीण राजकारणात बदलाचे संकेत मानले जात आहेत. धोंडगे यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न झाले होते; मात्र अखेरीस त्यांनी शिवसेनेची निवड केली.
एकनाथ शिंदेंकडून शंकर अण्णा धोंडगे यांचे तोंडभरून कौतुक
advertisement
शंकरअण्णा धोंडगे यांच्या कामाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकरी बाजू आणखी मजबूत होईल, असे शिंदे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा योग्य वेळी करू
advertisement
शेतकरी प्रश्नांवर बोलताना शिंदे म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकरी सन्मान योजनेतून थेट मदत, पिक विमा सुलभता, नैसर्गिक आपत्तीतील अटी शिथिल केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसह योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचाही निर्णय घेतला जाईल. शेतकरी सुखी झाला पाहिजे, आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
advertisement
अण्णांच्या प्रवेशाने शेतकरी संघटनात्मक जाळे मजबूत होईल
धोंडगे यांच्या प्रवेशामुळे राज्यभर शेतकरी संघटनात्मक जाळे मजबूत होईल आणि ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढेल, असेही शिंदे यांनी सांगितले. या वेळी धोंडगे यांच्यासह दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर, शिवराज धोंडगे, गोविंदराव भवर, मनोहर पटवारी, लक्ष्मणराव वंजे, अनिल फंड, बबनराव गवारे, मंचकराव बचाटे, दिलीप धोंडगे, भैय्यासाहेब पाटील, मारुती जाधव, अनिल यादव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
advertisement
शिवसेना मालक-नोकरांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष
शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. जो काम करेल तो पुढे जाईल आणि कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. आमदार-खासदार-मंत्री कार्यकर्तेच घडवतात, असे शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर पक्ष चालत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 3:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकरी संघटनेतील बडा नेता शिंदेसेनेत, एकनाथ शिंदे यांना अत्यानंद, नांदेडची गणितं बदलणार










