'ज्याला काम जमत नाही, त्याला....', शोएब अख्तरने काढले नक्वीचे धिंडवडे; पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, PCB चेअरमनची खुर्ची जाणार?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून 61 धावांनी झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून, शोएब अख्तरने थेट PCB च्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघाच्या अपयशामागे चुकीचे निर्णय आणि ‘स्टार संस्कृती’ जबाबदार असल्याचा त्याचा आरोप आहे.
इस्लामाबाद: भारताकडून टी-20 वर्ल्ड कपमध्ये 61 धावांनी झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) निशाणा साधला आहे. केवळ संघाच्या कामगिरीवर नव्हे, तर बोर्डाच्या नेतृत्वक्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
“चुकीच्या लोकांच्या हातात जबाबदारी”
मोठ्या पदांवर योग्य पात्रता नसलेली माणसं बसवणे हीच पाकिस्तान क्रिकेटची सर्वात मोठी चूक आहे, असे अख्तर म्हणाला. त्याचे हे वक्तव्य PCB चेअरमन मोहसिन नक्वी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका असल्याचे स्पष्ट दिसून येते. नेतृत्व पातळीवरील निर्णयांमुळेच संघाची घसरण होत असल्याचा आरोप अख्तरने केला.
स्टार संस्कृतीवरही प्रहार
अख्तरने संघातील वरिष्ठ खेळाडूंनाही सोडले नाही. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांसारखे खेळाडू मोठ्या सामन्यांत सातत्याने अपयशी ठरत असल्याचे त्याने म्हटले. कामगिरीपेक्षा ‘स्टार कल्चर’ला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्याने केला.
advertisement
“ज्याला काम जमत नाही, त्याच्याकडे सूत्रे का?”
अख्तरच्या मते, अयोग्य व्यक्तीकडे मोठी जबाबदारी दिली तर त्याचा परिणाम केवळ संघावर नाही; तर संपूर्ण व्यवस्थेवर होतो. निवड प्रक्रिया आणि नेतृत्वाचे निर्णय क्रिकेटिंग गुणवत्तेपेक्षा इतर निकषांवर घेतले गेल्याचे तो म्हणाला. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील याआधी PCB च्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. बोर्ड प्रमुखांनी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता.
advertisement
प्रशासनावर सतत वादळ
गेल्या वर्षभरात एशिया कपपासून वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तान क्रिकेट प्रशासन सतत वादांच्या भोवऱ्यात अडकले आहे. कधी स्पर्धा बहिष्काराच्या इशाऱ्यांमुळे, तर कधी राजनैतिक वक्तव्यांमुळे संघाच्या तयारीवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. इतर संघ रणनीती आखत असताना पाकिस्तान व्यवस्थापन मात्र वेगळ्याच वादात गुंतले होते, अशी टीका क्रिकेट वर्तुळात होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 3:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'ज्याला काम जमत नाही, त्याला....', शोएब अख्तरने काढले नक्वीचे धिंडवडे; पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, PCB चेअरमनची खुर्ची जाणार?










