हळद लागली, नवरीसोबत तुफान नाचला पोलीस नवरदेव, रात्रीत घडलं भयंकर, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लग्नाचा मांडव सजला होता, सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते आणि काही तासांतच अक्षता पडणार होत्या. पण लग्नाच्या काही तास आधी पोलीस नवरदेवासोबत भयंकर घडलं आहे.
लग्नाचा मांडव सजला होता, सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते आणि काही तासांतच अक्षता पडणार होत्या. मात्र, ज्या नवरदेवाच्या स्वागतासाठी वधू पक्ष सज्ज होता, तोच नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून, विशेष म्हणजे बेपत्ता झालेला नवरदेव आणि वधू दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
किनवट तालुक्यातील नागेशवाडी येथील रहिवासी योगेश दत्ता घुगे हा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याचा विवाह तालुक्यातीलच मदनापूर येथील एका तरुणीशी ठरला होता. ती तरुणीदेखील पोलीस दलातच सेवा बजावत आहे. दोन्ही पोलीस कुटुंबांनी वर्षभरापूर्वी हा विवाह निश्चित केला होता. मंगळवारी सकाळी ११.५४ मिनिटांच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार होता.
advertisement
हळदीत मनसोक्त डान्स, मग अचानक गायब
सोमवारी रात्री मदनापूर येथे हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वरात घेऊन नवरदेव वधूच्या घरी पोहोचला होता. यावेळी डीजेच्या तालावर नवरदेव योगेश आणि नवरीने एकत्र मनसोक्त डान्सही केला. रात्री उशिरापर्यंत सर्व काही आनंदाने सुरू होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती, तेव्हा योगेश अचानक गायब झाल्याचं समोर आलं.
advertisement
मोबाईल बंद आणि नातेवाईकांची धावपळ
सकाळी नातेवाईकांनी योगेशची शोधाशोध सुरू केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्याचा मोबाईलही बंद येत असल्याने कुटुंबीयांची धाकधूक वाढली. विवाहाच्या काही तासांपूर्वीच नवरदेव बेपत्ता झाल्याची बातमी समजताच वधूला मोठा धक्का बसला. आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर क्षणात चिंतेत झाले. सर्व नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही योगेशचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर हताश होऊन कुटुंबीयांनी किनवट पोलीस ठाणे गाठले आणि तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 8:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हळद लागली, नवरीसोबत तुफान नाचला पोलीस नवरदेव, रात्रीत घडलं भयंकर, नांदेडमधील धक्कादायक प्रकार








