'ज्याच्यासोबत बहिणीचं लफडं त्याला मार', पोलिसानेच भावाला भडकावलं, आंचलचा खळबळजनक आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सक्षमच्या हत्येनंतर त्याची प्रेयसी आंचल मामीडवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. यानंतर आता आंचलने एका पोलिसावर खळबळजनक आरोप केला आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सक्षमच्या हत्येनंतर त्याची प्रेयसी आंचल मामीडवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. त्याच्या नावाचं कुंकू लावलं. तसेच आयुष्यभर त्याच्या कुटुंबीयांची साथ सोडणार नाही, अशी शपथ घेतली. शिवाय तिने मारेकरी असणाऱ्या वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली. आता या प्रकरणात आंचलने खळबळजनक माहिती दिली आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या भावाला हत्येचा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं तिने सांगितलं आहे. संबंधित पोलिसामुळेच भावाला राग अनावर झाला आणि त्याने सक्षमची हत्या केली, अशी माहिती आंचलने दिली. तसेच घटनेच्या दिवशी काय घडलं? याचा सविस्तर खुलासा देखील तिने केला आहे.
समक्षच्या खून प्रकरणाची माहिती देताना आंचलने सांगितलं की, "27 तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ मला म्हणाला पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवर गुन्हा दाखल कर. तो बळजबरी करत होता. मात्र मी तक्रार दिली नाही. मी सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथं येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकावलं. त्यावर माझा भाऊ बोलला त्याला मरूनच इथं येतो. त्यानंतर ही हत्या घडली,"
advertisement
आंचलने पुढे सांगितलं की, "घटनेच्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं देव दर्शनालां जायचं आहे. पण माझ्या कुटुंबीयांनी मला परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊ सोबत नव्हते. आई आणि काका-काकू होते. आम्ही मानवतला थांबलो. तेव्हा तिथे पोलीस आले. त्यांच्यासोबत तिथे दोन्ही भाऊ आणि वडील पण होते. मला आश्चर्य वाटलं दोन्ही भाऊ आणि वडील का आले. तेव्हा मला सांगितलं की, सक्षमला दोन-तीन टाके पडले आहेत. तो रुग्णालयात आहे. तिथून पोलिसांनी मला नांदेडला आणलं. पोलिसांनी देखील काहीच सांगितलं नाही. पण पोलीस स्थानकात सकाळी सक्षमचा मयत असलेला फोटो पाहिला. तेव्हा मला सक्षमच्या हत्येबाबत कळालं."
advertisement
तिने पुढे सांगितलं की, "सक्षमला सगळे म्हणायचे की त्या मुलीचा (आंचल) नाद सोड. पण त्याने मला खूप जीव लावला, मग मी त्याची साथ कशी सोडू. आताही त्याची साथ सोडणार नाही. तो जगात नाही पण तरी त्याची साथ सोडणार नाही. मी त्याच्यासोबत आहे, त्याच्या परिवारासोबत आहे. माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे त्यांचा मुलगा गेला. आता मी त्यांची साथ नाही सोडू शकत."
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
December 01, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ज्याच्यासोबत बहिणीचं लफडं त्याला मार', पोलिसानेच भावाला भडकावलं, आंचलचा खळबळजनक आरोप


