Food Business: इच्छा तिथे मार्ग, क्लाउड किचनच्या माध्यमातून दिला महिलांना रोजगार
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Food Business: कोणतीही स्त्री आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवते.
नाशिक: असं म्हणतात, स्त्रीमध्ये प्रचंड इच्छा शक्ती असते. या इच्छाशक्तीच्या बळावर ती अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवते. नाशिकमधील सारिका वाडेकर या अशाच इच्छाशक्तीचं जिवंत उदाहरण ठरल्या आहेत. उच्च शिक्षण गाठीशी नसूनही त्यांनी केवळ इच्छाशक्तीच्या बळावर स्वत:चा व्यवसाय उभा केला. यातून त्या स्वत: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर झाल्याच शिवाय इतर महिलांना देखील त्यांनी मदतीचा हात दिला.
सारिका यांचा एका खेडे गावात जन्म झाला. इयत्ता 10पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर सारिका नाशिकला स्थायिक झाल्या. शिक्षण कमी असलं तरी आपण काहीतरी करावे, अशी त्यांची फार इच्छा होती. त्यांच्या पतीचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे लग्नानंतर सारिका यांची पाककलेत रुची वाढू लागली. त्यांनी रोज नवनवीन पदार्थ शिकण्यास आणि इतरांना चाखायला देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलाने आईच्या डोळ्यांतील स्वप्न हेरलं आणि 'क्लाउड किचन' सुरू करण्याचा पर्याय सुचवला. सारिका यांना मुलाची कल्पना फार आवडली आणि त्यांनी 'त्रिवेणी फूड्स' नावाने आपला व्यवसाय सुरू केला.
advertisement
सारिका या मागील आठ वर्षांपासून घरीच मोदक आणि फराळालासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करत आहे. त्यांच्या हातचे मोदक 12ही महिने चाखायला मिळत असल्याने अनेक मोदकप्रेमी त्यांना ऑर्डर्स देतात. आपल्या व्यवसायातून सारिका चांगले उत्पन मिळवत आहेत. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पतीचं आर्थिक ओझं वाटून घेतलं आहे. विशेष म्हणजे सारिका यांच्यामुळे इतर 10 महिलांना देखील रोजगार मिळाला आहे.
advertisement
सारिका यांच्याकडे नाशिकमध्ये सहजा सहजी उपलब्ध न होणाऱ्या फ्लेवरचे मोदक मिळतात. दरवर्षी काही तरी नवीन चव इतरांना चाखायला द्यावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यंदा देखील त्यांनी शाही गुलकंद फ्लेवरचे उकडीचे मोदक बनवले आहेत. तुम्हाला देखील हे मोदक चाखायचे असल्यास नाशिकमधील मखमलाबाद रोडवर असलेल्या वेडे बाबा मठासमोर 'त्रिवेणी प्रॉव्हिजन' या ठिकाणाला भेट देऊ शकता. ऑनलाइन ऑर्डरची सुविधा देखील उपलब्ध आहे. सारिका यांनी 'त्रिवेणी प्रोव्हिजन' नावाने इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलेलं आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 28, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Food Business: इच्छा तिथे मार्ग, क्लाउड किचनच्या माध्यमातून दिला महिलांना रोजगार

