नाशिकमध्ये पेट्रोल भरण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
नाशिक जिल्हा प्रशासनाने आणि पेट्रोल पंप चालक संघटनेने तातडीने खुलासा करत जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक : इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अफवांनी नाशिककरांची झोप उडवली आहे. पेट्रोल भरण्यावर निर्बंध या एका चुकीच्या माहितीमुळे बुधवारी रात्री नाशिकमधील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने आणि पेट्रोल पंप चालक संघटनेने तातडीने खुलासा करत जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर रात्री 8 वाजेनंतर नाशिक शहर आणि परिसरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतकरी देखील ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी मोठ्या रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, ही सर्व परिस्थिती केवळ अफवांमुळे निर्माण झाली असून जिल्ह्यात इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
advertisement
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये घबराट
इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे हे सत्य असले तरी केंद्र सरकारने देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
विनाकारण गर्दी करू नये
advertisement
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल पंप चालक मालक संघटनेनेही स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. पेट्रोल पंप बंद राहण्याचे कोणतेही आदेश नाहीत. नागरिकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे, विनाकारण गर्दी करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 9:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये पेट्रोल भरण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन








