अस्वस्थ असल्यानेच राजीनामा, जयंत पाटील अजित पवारांना साथ देणार? दादांच्या आमदाराचं सूचक विधान
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
जयंत पाटील यांनी अस्वस्थतेतून राजीनामा दिल्याचा दावा करीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत आहे, असे सूचकपणे संग्राम जगताप म्हणाले.
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा त्यांच्या पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ देतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी अस्वस्थतेतून राजीनामा दिल्याचा दावा करीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत आहे, असे सूचकपणे संग्राम जगताप म्हणाले.
जयंत पाटील यांचे नाव अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी त्यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा भेटी दिल्या होत्या. ते जरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत असले तरी त्यांच्या पक्षांतरच्या चर्चा अधून मधून सुरू असतात. त्यांच्या मनात एक अस्वस्थता कायम होतीच, असे संग्राम जगताप म्हणाले.
advertisement
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री होते. सरकार गेल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक झाल्या. आज तर त्यांनी राजीनामा देऊन या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं स्पष्ट केले. जर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर आम्ही कार्यकर्ते त्यांचे मनापासून स्वागत करू, असे संग्राम जगताप म्हणाले.
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा प्रवास
advertisement
जयंत पाटील यांनी अतिशय कठीण काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फडणवीस यांचे सरकार असताना जयंत पाटील यांच्याकडे शरद पवार यांनी जबाबदारी दिली होती. जवळपास गेल्या सात वर्षांपासून जयंत पाटील यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाचे काम केले. महाराष्ट्राच्या गाव खेड्यात जाऊन तेथील संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले. मविआ सरकार असतानाही जयंत पाटील यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद होते. सात वर्षांपासून त्यांच्याकडेच अध्यक्षपद असल्याने त्यांच्याजागी नवा व्यक्तीकडे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षातून झाली. शरद पवार यांनीही मागणीची नोंद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर यावर निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र त्यापूर्वीच जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 12, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अस्वस्थ असल्यानेच राजीनामा, जयंत पाटील अजित पवारांना साथ देणार? दादांच्या आमदाराचं सूचक विधान