Village Sale: ... म्हणून गावच विकायला काढलं! महाराष्ट्रातल्या या गावात नेमकं काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Village Sale: महाराष्ट्रातील काही गावांना अजूनही पाणी, रस्ते आणि विजेसाठी संघर्ष करावा लागत आहे. आता परभणीत गावकऱ्यांनी थेट गावच विकायला काढलं आहे.
परभणी : महाराष्ट्रातील काही गावांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा प्रशासनाचे दुर्लक्ष हे गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असते. परभणी जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार झाला असून संतापलेल्या गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडीच्या गावकऱ्यांनी थेट गावच विकायला काढले आहे.
गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा हा अवघा दीड किलोमीटरचा रस्ता ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. वारंवारच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टाकळवाडीकरांनी संपूर्ण गावच विक्रीसाठी काढल्याचं बॅनर लावले आहे. या अनोख्या आंदोलनाची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे.
advertisement
लेखी आश्वासनानंतरही कामाचा पत्ता नाही
गावकऱ्यांनी दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, आंदोलन करण्यात आले. अखेर पंचायत समितीकडून 16 ऑक्टोबरपासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपूनही रस्त्याच्या कामाला सुरुवातच झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी गाव विक्रीसाठी आहे, असे फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा अनोखा मार्ग अवलंबला आहे.
Location :
Parbhani,Maharashtra
First Published :
November 07, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
Village Sale: ... म्हणून गावच विकायला काढलं! महाराष्ट्रातल्या या गावात नेमकं काय घडलं?


