डॉक्टर मृत्यू प्रकरणानंतर अजून ३ गंभीर आरोप, ते लोक मीडियासमोर, रणजितसिंह नाईक निंबाळकर संकटात

Last Updated:

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर निंबाळकर यांच्यावर तीन नवे आरोप झाल्याने त्यांच्या कथित छळकथा समोर येऊ लागल्या आहेत. निंबाळकर यांनी पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून त्रास दिल्याचे अनेक जण माध्यमांना सांगत आहेत.

रणजितसिंह नाईक निंबाळकर (माजी खासदार)
रणजितसिंह नाईक निंबाळकर (माजी खासदार)
मुंबई : शेतकरी बापाच्या पोरीने मोठ्या संकटांना तोंड देऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, फलटणमध्ये नोकरीला सुरुवात केली परंतु राजकारणी लोकांपुढे आणि त्यांच्या दबावापुढे तिला झुकावे लागले. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी राजकारण्यांकडून वारंवार येणारा दबाव तसेच तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यासाठी रात्री अपरात्री येणारे फोन, वैयक्तिक आयुष्यातील ढवळाढवळ आदी कारणांमुळे तरुणीने आयुष्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्फत त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून माझ्यावर अनेकदा दबाव आला, वारंवार फोन यायचे, असे एका पत्रात तरुणीने लिहिल्यामुळे मृत्यू प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. विरोधकांनी देखील निंबाळकरांना खिंडीत गाठून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. परंतु डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर निंबाळकर यांच्यावर तीन नवे आरोप झाल्याने त्यांच्या कथित छळकथा समोर येऊ लागल्या आहेत. निंबाळकर यांनी पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून त्रास दिल्याचे अनेक जण माध्यमांना सांगत आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये जाऊन निंबाळकर यांना क्लिनचिट दिली आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात निंबाळकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडे 'तो' मुकादम समोर आणला

गरकळ नावाचे मुकादम आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर माजी खासदारांच्या कारखान्यावर आहेत. त्यांची काही बाकी शिल्लक होती. यावरून काहीसा वाद झाल्याने गरकळ यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना काहीही झाले नाही, ते पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहेत, यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला. खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने महिला डॉक्टरला अनेक वेळा फोन केले, असे सांगत संबंधित गरकळ नावाच्या मुकादमांना धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर आणले. निंबाळकरांच्या माणसांकडून गरकळ यांना कसा त्रास झाला, हे सांगून धनंजय मुंडे यांनी नाईक निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी केली.
advertisement

सुषमा अंधारे यांनी आगवणे कुटुंबाला समोर आणले

आगवणे कुटुंबातल्या जुळ्या बहि‍णींनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. याच अनुषंगाने त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट केली. त्यात त्या म्हणतात, ही वर्षा आगवणे.. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या क्रूर कहाण्यांपैकी एक कहाणी. दिगंबर आगवणेवर सध्या एक, दोन, तीन नाही तब्बल २४ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे शाळकरी मुलीवर मकोका सारखे गंभीर गुन्हे निंबाळकरांच्या कृपेने लागले आहेत. निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांच्या जाचाला कंटाळून याही मुलीने आपल्या जुळ्या बहिणी सकट आत्महत्येचा प्रयत्न केला, सुदैवाने ती वाचली. फलटण पोलीस स्टेशन ही छळ छावणी झाली आहे का?
advertisement
डॉक्टर तरुणीच्या संस्थात्मक हत्येला कारणीभूत असणाऱ्या सर्व लोकांना चौकशीच्या कक्षेत आणा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच DYSP राहुल धस, रुग्णालय प्रमुख अंशुमन धुमाळ, मयत डॉक्टरच्या जातीवरून, आडनावावरून आणि तिच्या जिल्ह्यावरून तिचा मानसिक छळ करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपात्रे, पोलीस निरीक्षक पाटील तसेच ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला ते निंबाळकरांचे कार्यकर्ते दिलीप भोसले या सर्व लोकांवर आरोपपत्र ठेवले जावे, असे अंधारे म्हणाल्या.
advertisement

निंबाळकरांच्या दबावामुळे आमच्या मुलीचा पीएम रिपोर्ट बदलण्यात आला

माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, पण त्यावर मृत डॉक्टर तरुणीची सही होती. तिच्यावर बनावट पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी नाईक निंबाळकर यांच्याकडून दबाव टाकला गेला होता, असा दावा भाग्यश्री मारुती पांचगणे या महिलेने केला आहे. त्यामुळे साताऱ्याच्या दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टर मृत्यू प्रकरणानंतर अजून ३ गंभीर आरोप, ते लोक मीडियासमोर, रणजितसिंह नाईक निंबाळकर संकटात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement