PMC Election: आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवारचा भडका आता निवडणुकीच्या मैदानात! दोन्ही कुटुंबं पुन्हा आमनेसामने
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
PMC Election : आंदेकर टोळीने हत्या केल्याचा आरोप असलेल्या आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी कोमकर यांनी थेट सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे: पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेल्या आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमधील संघर्ष आता थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले असून, त्यामुळे राजकारणासोबतच कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंदेकर टोळीने हत्या केल्याचा आरोप असलेल्या आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी कोमकर यांनी थेट सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुंड बंडू आंदेकर ची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच कल्याणी कोमकर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. याआधी आंदेकर कुटुंबीयांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्यास आत्मदहन करेन, असा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला होता. मात्र, पक्षाने आंदेकर कुटुंबालाच उमेदवारी दिल्याने अखेर त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
advertisement
एकेकाळी कौटुंबिक नात्यांनी जोडलेली आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांमध्ये गुंडगिरीने जीवघेणं वैमनस्य तयार झाले. प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ व नाना पेठ या भागात या दोन कुटुंबात आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि त्यांचा भाचा आयुष कोमकर यांच्या खून प्रकरणानंतर आंदेकर आणि कोमकर कुटुंबांमध्ये तीव्र रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर इतर पातळीवरही महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
एकाच प्रभागात, एकाच कुटुंबातून आलेले पण परस्परविरोधी उमेदवार असल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. स्थानिक प्रश्न, राजकीय पाठबळ आणि कौटुंबिक संघर्ष यांचा मेळ या निवडणुकीला वेगळंच वळण देणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. पुण्याच्या राजकारणात हा सामना कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PMC Election: आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवारचा भडका आता निवडणुकीच्या मैदानात! दोन्ही कुटुंबं पुन्हा आमनेसामने










