पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, प्रफुल पटेल यांची घोषणा, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहिल्याने चर्चा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर जाणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल यांनी केली.
मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षाच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला पार्थ पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईतील वरळी डोममधील हॉलमध्ये झाली. या बैठकीला राज्यातील आणि देशभरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
advertisement
राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार
दुसरीकडे पार्थ पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागेल, अशी चर्चा असताना तेच अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाल्या. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संपल्यानंतर पार्थ पवार यांच्या विषयी विचारले असता प्रफुल पटेल यांनी त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा केली. येत्या १६ मार्च रोजी राज्यातील सात राज्यसभेच्या जागांसाठी मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार अर्ज दाखल करतील, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
advertisement
पार्थ पवार यांची राजकीय कारकीर्द
पार्थ पवार २०१९ साली राजकारणात आले
मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी नशीब आजमावले
परंतु शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना पराभूत केले
तेव्हापासून त्यांनी निवडणूक लढवली नाही परंतु संघटनेत कार्यरत आहेत
पक्षाच्या बैठक आणि प्रचाराचे नियोजन, आदी कामांत पार्थ पवार यांचा सहभाग असतो
आता पार्थ पवार राजकारणातील आपली दुसरी इनिंग सुरू करतील
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 7:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, प्रफुल पटेल यांची घोषणा, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहिल्याने चर्चा








