Dharashiv ZP: प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, सरनाईक भाजपवर संतापले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. “सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढेही एकत्रित सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही,” असे ते म्हणाले.
बोलघेवड्यांनी बोलू नये
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता ताई पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवणार आहोत, असे सांगताना सरनाईक यांनी पक्षाच्या पुढील रणनीती बाबत बोलघेवड्यांना भाष्य न करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
advertisement
सत्ता हे ध्येय पण तत्वांशी तडजोड करणार नाही
सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv ZP: प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, सरनाईक भाजपवर संतापले









