अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं? शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, "ज्याने माझ्या मुलाला..."
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. निधनाच्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो, अशा आशयाचं वक्तव्य कदम यांनी केलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरीही कदम यांनी अशाप्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
शपथविधीवरून गलिच्छ राजकारणाचा आरोप
रामदास कदम यांनी अजितदादा पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना तटकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती, तोच तटकरेंनी वहिनींना (सुनेत्रा पवार) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीनुसार किमान दहा दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते?"
advertisement
शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, या भीतीने तटकरेंनी ही 'चालाख खेळी' केल्याचा दावा कदमांनी केला. ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
"माझ्या मुलालाही संपवण्याचा प्रयत्न केला"
सुनील तटकरे यांनीच अजितदादांना संपवलं, या विरोधकांच्या आरोपाला दुजोरा देताना कदम म्हणाले की, तटकरे काहीही करू शकतात. "ज्यांनी त्यांना मोठं केले, त्यांनाच संपवण्याचं काम ते करतात. माझ्या मुलाला (योगेश कदम) राजकारणात संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
advertisement
कोकणात युती न होण्याचे मुख्य कारण
रामदास कदम यांनी तटकरेंवर विश्वासघात केल्याचा आरोप करताना जुन्या कुरघोड्यांची आठवण करून दिली. "लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंना खासदार करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट केले. मात्र, विधानसभेच्या वेळी त्यांनीच आम्हाला दगा दिला. योगेश दादांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली. याच विश्वासघातामुळे कोकणात शिवसेनेने राष्ट्रवादीशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. या खळबळजनक आरोपांमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 7:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं? शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, "ज्याने माझ्या मुलाला..."








