"मोबाइल चेक करा, निलेश घायवळचा दादांना कितीवेळा...", रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळचे निरोप जात असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. परदेशात जाण्यासाठी त्याने बनावट पासपोर्टचा वापर केल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, हाणामारी असे अनेक गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा दिला? त्याच्यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक दावा केला आहे.
पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळचे निरोप जात असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. यावेळी धंगेकर यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पाटील नावाच्या व्यक्तीचा देखील उल्लेख केला. या पाटील नावाच्या व्यक्तीच्या फोनची तपासणी केली तर निलेश घायवळबाबतचे अनेक खुलासे होतील, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.
advertisement
चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो. त्याच्या सर्व मोबाईलची आणि नंबरची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला अन् दादांना (चंद्रकांत पाटील) किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल, असा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला.
यावेळी त्यांनी आपल्याच महायुती सरकारवर देखील निशाणा साधला आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेत पोलीस काही करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. निलेश घायवळ एकटा काहीच करू शकत नाही. पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नेस्तानाबूत होईल. त्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी ही पिलावळ वाढवली आहे, त्यांचा तपास करणं गरजेचे आहे, असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 05, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"मोबाइल चेक करा, निलेश घायवळचा दादांना कितीवेळा...", रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा