'कॅप्टन'सोबत फोटो, मुख्यमंत्र्यांचा दट्ट्या बसताच खुर्चीवरून पायउतार, राजीनामा पत्रात चाकणकर काय म्हणाल्या?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शेवटचा प्रयत्न म्हणून चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. परंतु प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन राजीनामा द्या, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितल्यावर अखेर चाकणकर यांचा नाईलाज झाला.
मुंबई : नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरात याच्याशी असलेली विशेष जवळीक तसेच त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर चाकणकर या सदस्य असल्याने त्यांची सलगी अधोरेखित होत होती. राज्यातल्या सर्वच क्षेत्रातून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याने अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. परंतु प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन राजीनामा द्या, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितल्यावर अखेर चाकणकर यांचा नाईलाज झाला.
नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात खरातची गुरूवारी दोन तास कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते. दरम्यान अशोक खरात याची चौकशी सुरू असताना चाकणकर यांच्यावर राजीनाम्याचा वाढता दबाव होता. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
advertisement
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय?
मी रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. धन्यवाद...!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 10:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कॅप्टन'सोबत फोटो, मुख्यमंत्र्यांचा दट्ट्या बसताच खुर्चीवरून पायउतार, राजीनामा पत्रात चाकणकर काय म्हणाल्या?









