समृद्धी महामार्गावर शहापूरमध्ये भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर येथे लोखंडी पोलने भरलेल्या टेम्पो ट्रकच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू, सुरक्षिततेबाबत प्रवाशांची चिंता वाढली.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत पुन्हा एकदा एका भीषण अपघात झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उभ्या असलेल्या एका ट्रकला लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या टेम्पो ट्रकने धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी पोलने भरलेला एक टेम्पो ट्रक मुंबईकडे येत होता. अचानक, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकचा अंदाज न आल्याने चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला ब्रेक लावणे शक्य झाले नाही. गाडी अचानक थांबवल्यामुळे मागील बाजूस भरलेले लोखंडी पोल गाडीच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांनी केबिनचा अक्षरशः चुराडा केला.
advertisement
या दुर्घटनेत टेम्पोतील दोघंही लोखंडी सळ्या लागून मृत्युमुखी झाले. घटनेची माहिती मिळताच,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. - घटना स्थळी जीवरक्ष टीम सदस्य आणि महामार्ग, शहापूर पोलिस पोहचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने यावर तातडीने लक्ष देऊन अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी आता प्रवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. समृद्धी महामार्गावर वेगामुळे बरेचसे अपघात होत आहेत त्यामुळे यावर नियंत्रण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:15 AM IST