सांगलीत गाढवांच्या चोरीचा 'आंध्र' पॅटर्न! 3.5 लाखांची 23 गाढवं लंपास, पोलीसही हैराण
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा गाढवांच्या चोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. हरिपूर येथील रहिवासी अरविंद पोपट माने यांची तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीची 23 गाढवं...
सांगली : देशभरात सध्या गाढवांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि सांगली जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. सुमारे तीन वर्षांपूर्वी सांगलीतून गाढवांच्या तस्करीचे एक मोठे प्रकरण गाजले होते. आता पुन्हा एकदा सांगली शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीची 23 गाढवं चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या गाढवांच्या तस्करीत गुंतलेले चोर आंध्र प्रदेशातून, म्हणजेच सुमारे 800 किलोमीटर दूरून सांगलीत आल्याचे तपासात उघड झाले आहे. सांगली शहर पोलीस आता या चोरांच्या मागावर आहेत.
...आणि 23 गाढवं झटक्यात झाली गायब
घडले असे की, हरिपूर येथील रहिवासी अरविंद पोपट माने यांनी 22 तारखेला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांची 23 गाढवं सांगलीतील भाजी मंडई परिसरात चरण्यासाठी सोडली होती. पाऊस सुरू असल्याने, थोड्या वेळाने येऊन गाढवांना बांधू असे ठरवून ते घरी गेले. मध्यरात्रीनंतर जेव्हा ते गाढवांना बांधण्यासाठी मंडईजवळ परत आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांची सर्व 23 गाढवं गायब झाली होती!
advertisement
टेम्पोमध्ये कोंबून नेली सर्व गाढवं
गेले काही दिवस माने गाढवांच्या शोधात सर्वत्र फिरत होते. चौकशीअंती त्यांना ही गाढवे तस्करीच्या उद्देशाने चोरली असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी जवळपास साडेतीन लाख रुपयांच्या गाढवांच्या चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्रीच्या वेळी एका टेम्पोमधून गाढवांना कोंबून नेले जात असल्याचे दिसून आले आहे.
advertisement
गाढवांची तस्करी कशासाठी?
गाढवांची तस्करी नेमकी कशासाठी केली जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मिळालेल्या माहितीनुसार, सौंदर्यप्रसाधने आणि महिलांच्या गर्भाशयाच्या आजारांवरील औषधे बनवण्यासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. याशिवाय, आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये 'उत्तेजना' वाढवण्यासाठी आहारातून गाढवाच्या मांसाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वीच समोर आली आहे. याच कारणामुळे आंध्र प्रदेश हे गाढव तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात गाढवांची कातडी तस्करी करून पाठवली जाते.
advertisement
तीन वर्षांपूर्वीची चोरी पुन्हा चर्चेत
view commentsनोव्हेंबर 2022 मध्येही सांगलीतील अमोल माने आणि रोहित माने यांच्या मालकीची 26 गाढवं चोरीला गेली होती. त्यावेळी केलेल्या तपासातही गाढव तस्करीचे प्रकरण उघडकीस आले होते आणि त्यावेळीही आंध्र प्रदेश कनेक्शन समोर आले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची गाढवांची चोरी झाल्याने पोलीस अधिक गंभीरतेने तपास करत आहेत. या घटनेमुळे गाढव तस्करांचे जाळे सांगलीपर्यंत कसे पोहोचले आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 7:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीत गाढवांच्या चोरीचा 'आंध्र' पॅटर्न! 3.5 लाखांची 23 गाढवं लंपास, पोलीसही हैराण


