Satara ZP : सातारा ZP वाद चिघळला, शिवसेनेच्या मंत्री-आमदारांची तातडीची बैठक, एकनाथ शिंदे संतप्त, ''मंत्री-आमदारांना दुय्यम वागणूक...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde On Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे पडसाद आता थेट राज्य सरकारमध्ये उमटू लागले आहेत. या प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे मंत्री आमने-सामने आल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे पडसाद आता थेट राज्य सरकारमध्ये उमटू लागले आहेत. या प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे मंत्री आमने-सामने आल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली असल्याचे दिसून आले आहे. विधान परिषद आणि विधानसभेतही सातारा जिल्हा परिषद राड्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर या वादाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी बैठकीत घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलीस आणि लोकप्रतिनिधींमध्ये संघर्ष झाला होता. यावरून विधान परिषदेत शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सातारा पोलीस अधीक्षक घरगड्यासारखे वागले, त्यांनी मंत्र्यांना धक्काबुक्की केली," असा खळबळजनक आरोप देसाई यांनी केला. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
advertisement
भाजप-शिवसेना आमने-सामने
निलंबनाच्या या आदेशानंतर भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक होत या कारवाईला विरोध केला. "वस्तुस्थितीचा अहवाल न घेता एका आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन करणे चुकीचे आहे," असे म्हणत गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावरच निशाणा साधला. सत्तेतील दोन प्रमुख पक्षांचे मंत्री सभागृहात एकमेकांशी भिडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.
advertisement
विधानसभेतही पडसाद....
विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील घटनेबाबत भाष्य केले. आपण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली होती. कोणताही सदस्य मतदानापासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, तसे झाले नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे जाहीर केले.
advertisement
शिंदे गटाची मंत्री-आमदारांची तातडीची बैठक...
यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार-मंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीत साताऱ्यात झालेल्या प्रकारावरून उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या मंत्र्यांचा, आमदारांचा सन्मान राखला पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे, असा संताप एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाविरोधात विधीमंडळाच्या पायरीवर घोषणाबाजी करत आंदोलन केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara ZP : सातारा ZP वाद चिघळला, शिवसेनेच्या मंत्री-आमदारांची तातडीची बैठक, एकनाथ शिंदे संतप्त, ''मंत्री-आमदारांना दुय्यम वागणूक...''









