हिंदुस्थानवर राज्य करणारे छत्रपती, थोरल्या शाहू महाराजांची समाधी पाहिली का? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
संगम माहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाले आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी पूर्ण केले. स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथील रंगमहालात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली होती. संगम माहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाले आहे.
advertisement
छत्रपती शाहू महाराज यांची कारकीर्द
भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले. मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
advertisement
समाधीचा इतिहास
छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनांनतर संगम माहुली येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. येथील समाधीस्थळावर एकच शिवलिंग होतं. मात्र कालौघात नदीला पाणी आल्यामुळे ते शिवलिंग वाहून गेलं. नंतर दुसऱ्या शिवलिंगाची इथे प्रतिष्ठापना केली. त्यानंतर काही वर्षानंतर वाहून गेलेले जुने शिवलिंग सापडलं. त्यामुळे पुन्हा दोन्ही शिवलिंगाची स्थापना समाधीस्थळी करण्यात आली. इंग्रजांच्या कालखंडामध्ये साताऱ्यात चार्ल्स किंकेड हे जिल्हा न्यायाधीश होते. ते माहुली येथे आले असता या समाधीची 16 संस्कारांची पूजा होताना त्यांनी पहिली आहे. या पूजेचे वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिले असल्याचे देखील इतिहास तज्ज्ञ घनश्याम ढाणे यांनी सांगितले.
advertisement
छत्रपती शाहूंच्या समाधीचा जीर्णोद्धार
छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचा लोकसहभागातून जीर्णोद्धार करण्याचा संकल्प साताऱ्यातील नागरिकांनी केला होता. त्यानुसार या कामास ऑक्टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. मूळ समाधीस धक्का न लावता त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने या समाधीचा जिर्णोद्धार करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या पुण्यतिथीदिवशी संगम माहुली येथे हजारो शिवप्रेमी आणि सातारकर उपस्थित राहिले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
May 11, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
हिंदुस्थानवर राज्य करणारे छत्रपती, थोरल्या शाहू महाराजांची समाधी पाहिली का? Video