संतापजनक! सुरक्षारक्षकाचा पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नागपूर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पीडित बालिका मजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.
ही घटना बेलतरोडी परिसरातील सिंगापूर सिटी भागात घडली. पीडित बालिका मजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकलीसोबत घडलेला हा अमानुष प्रकार समजताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. तो या परिसरात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. याशिवाय आरोपी मानसिक आजाराने त्रस्त असून तो नियमित औषधे घेत असल्याचा दावा त्याच्या बहिणीने केला आहे. मात्र हा मुद्दा पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
advertisement
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सध्या पीडित बालिकेवर नागपूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बालिकेच्या पालकांचे जबाब घेण्यात आले असून, आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, आरोपीच्या मानसिक स्थितीची तपासणीसाठी वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
advertisement
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अवघ्या पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या या अमानुष कृत्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजातील विकृत मानसिकतेमुळे बालिकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. या घटनेने नागपूरकर संतप्त झाले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Oct 05, 2025 5:32 PM IST










