संभाजीनगरात मोठा राजकीय राडा, अंबादास दानवेंची भाजप नेत्याला मारहाण, कॉलर पकडली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
संभाजीनगरात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे. भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली आहे.
नेमका वाद कशावरून?
पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. भाजपचे उमेदवार कल्याण गायकवाड यांनी ठाकरे गटाचे तीन सदस्य पळवून नेल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. यामध्ये पंढरपूर गणातील लताबाई कानडे, वडगाव कोल्हाडीचे सतीश हिवाळे आणि दत्तात्रय वर्पे या सदस्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. हे सदस्य अचानक 'नॉटरिचेबल' झाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला.
advertisement
अंबादास दानवे यांचा आक्रमक पवित्रा
आपले सदस्य गायब झाल्याचे समजताच अंबादास दानवे यांनी थेट मैदानात उतरून भाजप उमेदवाराला जाब विचारला. या राड्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना दानवे म्हणाले की, "जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, भाजपचे लोक कुठे पैशांचे आमिष दाखवून तर कुठे धमक्या देऊन आमचे सदस्य उचलून नेतात. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे होते, म्हणूनच मी भाजप उमेदवाराला पकडले आणि त्यांच्या कानाखाली वाजवली."
advertisement
शिंदे गटावरही साधला निशाणा
दानवे यांनी पुढे असा दावा केला की, भाजपने केवळ ठाकरे गटाचेच नाही तर शिंदे गटाचे सदस्यही आपल्या ताब्यात ठेवले आहेत. सध्या शिंदे गटातही अंतर्गत दोन गट पडले असल्याचे त्यांनी नमूद केले. "आमच्या सदस्यांनी भाजपसोबत जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, पण ते गेले तर पुढे काय होईल सांगता येत नाही, ही शिवसेना आहे हे लक्षात ठेवा," असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
बंडखोर सदस्यांना कारवाईचा इशारा
पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाणाऱ्या सदस्यांनाही दानवे यांनी कडक इशारा दिला आहे. "शिवसैनिकांनी मेहनत करून निवडून दिलेले दत्ता वर्पे, सतीश हिवाळे आणि लताताई कानडे हे सदस्य कालपासून नॉट रिचेबल आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक राहावे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. या राड्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरात मोठा राजकीय राडा, अंबादास दानवेंची भाजप नेत्याला मारहाण, कॉलर पकडली अन्...








