'मटण पार्टी देऊन गर्दी जमवली' सोलापुरात राजकारण फिरणार, आमदार वादाच्या भोवऱ्यात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
माळशिरसच्या 22 गावांसाठी पाणी मागणीच्या आंदोलनात आमदार उत्तमराव जानकर यांनी आंदोलकांना मटण पार्टी दिल्याने राजकीय वाद आणि टीका वाढली आहे.
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी सोलापूर: माळशिरस मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा-देवघर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी त्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना चक्क मटण पार्टी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्यावरुन स्थानिक पातळीवर राजकारण सुरू झालं आहे.
माळशिरस-म्हसवड महामार्गावर आज सकाळी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपस्थित सर्व आंदोलकांना मटण जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनासाठी गर्दी जमवण्यासाठीच ही मटण पार्टी आयोजित केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गोरे म्हणाले, हे आंदोलन पाणी आणि जनतेच्या प्रेमातून झालेले नाही, तर निव्वळ स्टंटबाजी आहे. आमदार जानकर यांनी जाता-जाता हे आंदोलन केले असून, फक्त मटण पार्टीच्या बळावर त्यांनी गर्दी जमवली हे त्यांच्या या कृतीतून त्यांची आंदोलनाबद्दलची गांभीर्यहीनता दिसून येतं.
advertisement
या आंदोलनाचे मूळ कारण माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा-देवघर धरणातून पाणी देण्याशी संबंधित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे येथील शेतकरी सातत्याने पाण्याची मागणी करत आहेत. आमदारांनी या मागणीसाठी आंदोलन करणे योग्य असले, तरी त्यासाठी कार्यकर्त्यांना मटण पार्टी देऊन गर्दी जमवण्याची पद्धत चुकीची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
advertisement
या घटनेमुळे राजकीय नैतिकता आणि आंदोलनाचे स्वरूप यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी जानकर यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. लोकहितासाठीचे आंदोलन हे खऱ्या समस्यांवर आधारित असावे, निव्वळ देखावा नसावा, अशी प्रतिक्रियाही काही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. या मटण पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाने आणखीच जोर धरला आहे.
advertisement
पुढील काळात विरोधक या मुद्द्यावरून आमदार जानकर यांना आणखी घेरण्याची शक्यता आहे. तसेच, सत्ताधारी पक्षही या संधीचा फायदा घेऊन जानकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करू शकतो.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 08, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मटण पार्टी देऊन गर्दी जमवली' सोलापुरात राजकारण फिरणार, आमदार वादाच्या भोवऱ्यात