सासूचा काटा काढायला गेली अन् स्वत:चंच कुंकू पुसलं; सोलापुरात अनैतिक संबंधांचा ‘विषारी’ कट!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pandharpur News: 2013 साली समाधान यांचा विवाह सारिकाशी झाला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सारिकाचे शेखरशी प्रेमसंबंध सुरू होते.
पंढरपूर: अनैतिक संबंधात आडव्या येणाऱ्या सासूचा काटा काढायला गेलेल्या महिलेचंच कुंकू पुसलं. पंढरपूर तालुक्यातील उंबरगावमध्ये अनैतिक संबंधातून रचलेल्या विषारी कटामुळे एक कुटुंब उद्धवस्त झालं. प्रियकरासोबतचा हा कट अखेर पतीच्या जीवावर बेतला असून समाधान गणपत लोहार (वय 34u) यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पत्नी सारिका आणि तिचा प्रियकर शेखर संताराम चंदनशिवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, 2013 साली समाधान यांचा विवाह सारिकाशी झाला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सारिकाचे शेखरशी प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधाची माहिती समाधान व त्यांची आई विमल यांना होती. त्यामुळे घरात सतत वाद होत होते. सारिका आणि शेखर यांनी सासू विमल यांचा काटा काढण्याचा कट केला.
advertisement
सासूला मारण्याचा कट
10 जानेवारी 2026 रोजी सकाळी शेखरने सारिकाला गावाबाहेरील शेतात बोलावून विषारी औषधाची बाटली दिली. सासूला संपवण्यासाठी रात्री आठच्या सुमारास सारिकाने घरातील पाण्याच्या कळशीत विषारी औषध मिसळले. हे पाणी सासू विमल यांनी तांब्यात घेतले; मात्र चव कडू लागल्याने त्यांनी ते न पिता तांब्या तसाच ठेवून दिला.
समाधानचा जीव गेला
जेवणानंतर अनभिज्ञ असलेल्या समाधानने तेच पाणी पिले. काही तासांतच त्यांना तीव्र उलट्या व अस्वस्थता जाणवू लागली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र 16 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाणे करत असून, महिन्यानंतर उघडकीस आलेल्या या विषारी कटाने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सासूचा काटा काढायला गेली अन् स्वत:चंच कुंकू पुसलं; सोलापुरात अनैतिक संबंधांचा ‘विषारी’ कट!







