शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांचा दिल्ली दौरा; मुनगंटीवार स्पष्टच बोलले
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी लगेच दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. यावर आता मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर, 12 नोव्हेंबर, महेश तिवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. दिवाळीनिमित्त शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवास्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार हे दिल्लीला गेले, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं होतं. आता यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
अमित शाह हे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीचा कुणी गैर अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया या भेटीवर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार भेटीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचं स्वागत करतो. एका घरातील दोन जण जरी राजकारणात असले तरी घरात राजकारण येऊ नये असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
दरम्यान दुसरीकडे मात्र अमित शाह आणि अजित पवार भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना टोला लागवला आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर बरं वाटल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार यांना चिमटा घेतला आहे. अजितदादांशी माझा संपर्क नाही, त्यामुळे त्यांना कोणता ताप आलाय माहिती नाही. त्यांना ताप आहे की, सहकाऱ्यांचा मनस्ताप असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2023 3:31 PM IST