Thane News: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडले, घोषणाबाजीने ठाण्यात तणाव, नेमकं झालं काय?
- Reported by:AJIT MANDHARE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Thane News : ठाण्यातील राबोडी परिसरात मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले
ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड प्रचारासाठी राबोडी परिसरात दाखल झाले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड हे आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राबोडी परिसरात गेले होते. त्याच वेळी नजीब मुल्ला यांच्या काही कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने आले आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या घोषणाबाजीद्वारे आव्हाड यांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सुदैवाने, या घटनेत कोणतीही हाणामारी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात प्रचाराला वेग आला असून, वेगवेगळ्या राजकीय गटांतील आरोप-प्रत्यारोप आणि शक्तिप्रदर्शन वाढताना दिसत आहे. राबोडीतील या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचे पडसाद रस्त्यावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
advertisement
ठाणे महापालिकेची निवडणूक ही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी महत्त्वाची आहे. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील झाले होते. त्याआधीच राष्ट्रवादीतील फुटीमुळे आव्हाड यांची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा-मुंब्रा या भागात अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आव्हाड प्रयत्नशील आहेत.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडले, घोषणाबाजीने ठाण्यात तणाव, नेमकं झालं काय?









