Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शहाड उड्डाण पूल 15 दिवस बंद; कुठून कराल प्रवास,पर्यायी मार्ग कोणता?
Last Updated:
Kalyan Malshej Highway Closed : कल्याण शहाड उड्डाण पूल दुरुस्तीकरिता 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. चला तर सविस्तर जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते असतील.
कल्याण : कल्याण शहरातील शहाड येथील उड्डाण पुलाची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. त्या कारणामुळेच या काळात शहाड पुल तब्बल 15 दिवस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. कल्याणहून मुरबाडमार्गे माळशेज, अहिल्यानगर, जुन्नर भागाकडे जाणारी आणि येणारी वाहने याच पुलावरून जातात. त्यामुळे हा पुल वाहतुकीच्या दुष्टीने महत्त्वाचा आहे तसेच म्हारळ ते मुरबाड तालुका हद्दीतील गावांमधील नोकरीसाठी जाणारे, व्यावसायिक तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळे आणणारी वाहने याच पुलाचा वापर करतात. पुलावर अनेक खड्डे पडले असून सांधे जोड खराब झाल्याने पावसाचे पाणी आत मुरले आहे. त्यामुळे पुलाला गळती लागून रस्ता अधिकच खराब झाला आहे. यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने पुलाची दुरुस्ती तातडीची झाली होती.
advertisement
प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते?
पुलाची दुरुस्ती सुरू असताना वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे.
1)मुरबाड, माळशेज घाटाकडून शहाड पुलाकडे येणारी वाहने
या वाहनांना बारवी डॅम फाटा, मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात येईल. त्यामुळे ही वाहने बारवी डॅम फाटा येथून बदलापूर रस्त्याने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग गड रस्ता, लोढा पलावा, शीळ-डायघर किंवा पत्रीपूलमार्गे इच्छित ठिकाणी जाऊ शकतील.
advertisement
2)मुरबाड तालुक्यातून शहाड पुलाकडे येणारी वाहने
या वाहनांना दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहने रायतागाव येथे डावे वळून वाहोली गाव, मांजर्ली, दहागाव, एरंजाड, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, शिळ-डायघर किंवा पत्रीपूलमार्गे पुढे जाऊ शकतील.
3)कल्याण, भिवंडी, ठाणेकडून शहाड पुलावरून मुरबाड आणि माळशेजकडे जाणारी वाहने
या वाहनांना दुर्गाडी पुल येथे प्रवेश बंद करण्यात येईल. त्यामुळे ही वाहने दुर्गाडी पुल येथून उजवीकडे वळून गोविंदवाडी वळण रस्ता, पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी नाका, पालेगाव, बदलापूरमार्गे मुरबाडकडे जातील.
advertisement
दुरुस्तीच्या काळात सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड आणि जड वाहनांना पर्यायी रस्त्यांवर प्रवेश बंद राहणार आहे.परंतू, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. शहाड उड्डाण पुलाच्या दुरुस्तीमुळे नागरिकांना काही दिवस अडचणींचा सामना करावा लागेल पण पुढील काळात या पुलावरून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 7:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शहाड उड्डाण पूल 15 दिवस बंद; कुठून कराल प्रवास,पर्यायी मार्ग कोणता?