अडीच वर्षांच्या चिमुरड्याचे अक्षरश: लचके तोडले, रुग्णालयात सोडला जीव, मालेगावमधील घटना
- Reported by:BABBU SHAIKH
- Published by:Sachin S
Last Updated:
शाबाजच्या कुटुंबीयांनी धाव घेतली आणि त्याला जखमी अवस्थेत तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराचा बाहेर खेळणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या या अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावच्या मालदे शिवरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत एका अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मोहंमद शाबाज असं या बालकाचं नाव आहे.
मालेगाव शहराच्या मालदा शिवारात राहणारा मृत मुलगा मोहम्मद शाबाज हा घराच्या बाहेर अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक काही मोकाट कुत्र्याच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांनी शाबाजचे अक्षरश: लचके तोडले. शाबाज ज्यावेळी खेळत होता, त्यावेळी जवळपास कुणी नव्हतं. जेव्हा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा स्थानिकांनी धाव घेतली आणि कुत्र्यांना हुसकावून लावलं.
advertisement
शाबाजच्या कुटुंबीयांनी धाव घेतली आणि त्याला जखमी अवस्थेत तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. जखमी अवस्थेत असलेल्या शाबाजचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.
सध्या शहरांत मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गल्ली बोळात कुत्र्यांचे टोळके फिरत असतात. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला आणि लहान मुलांना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. आज घडलेल्या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 11:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अडीच वर्षांच्या चिमुरड्याचे अक्षरश: लचके तोडले, रुग्णालयात सोडला जीव, मालेगावमधील घटना







