Raj Thackeray :मोर्चा टळला पण ठाकरे एकत्र येणार, उद्धव यांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद; 5 जुलैबाबत दिली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray : त्रिभाषा सक्तीविरोधी मोर्चा रद्द झाल्यानंतरही उद्धव आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र विजयी मेळाव्यात दिसणार आहेत.
मुंबई : राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सक्तीचा जीआर रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाची घोषणा केली होती. राज ठाकरे यांच्या या हाकेला शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्ष, संघटनांनी साद देत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. जीआर रद्द झाल्यानंतर आता 5 जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. ५ तारखेला जल्लोष मोर्चा होणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीदेखील त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकाच मंचावर अनेक वर्षांनी दिसणार आहेत.
राज ठाकरे यांनी शिवतीर्थ बंगल्यावर आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, हिंदीबाबतचा जीआर रद्द करण्यास भाग पाडलं, यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. सगळीकडून जनमताचा, असंतोषाचा रेटा आला, त्याचा परिणाम झाला. साहित्यिक, मोजके कलावंत यांचेही आभार मानतो. त्यांनीदेखील या मुद्यावर आपला आवाज उठवला.
advertisement
हा मुद्दा श्रेयवादाचा नाही, मनसेकडून सरकारच्या आदेशावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यावरून तीन पत्रे दिली होती. आता, सरकारने आदेश रद्द केला आहे. सरकार पुन्हा अशा भानगडीत जाणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. सरकारला या भानगडीत पडण्याची गरज नव्हती. सरकारने समिती नेमावी वगैरे पण पुन्हा अशा निर्णयांची गरज नाही असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
advertisement
ठाकरे बंधू एकत्र दिसणार...
5 जुलैचा मोर्चा रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी, उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै जल्लोष सभा होणार असल्याचे सांगितले. मनसेसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला. आता, त्याऐवजी विजयी मेळावा घेण्याची सूचना त्यांनी मांडली. त्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ जाहीर न करण्याबाबत त्यांना सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वेळ आणि ठिकाण निश्चित करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
राज ठाकरे यांनी म्हटले की, सरकारविरोधात सगळेजण एकवटले होते. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. मराठीसाठी सगळे एकत्र आले होते. 5 जुलै रोजीचा विजयी मेळावा देखील राजकारणाच्या पलिकडे पाहिला हवा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray :मोर्चा टळला पण ठाकरे एकत्र येणार, उद्धव यांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद; 5 जुलैबाबत दिली मोठी अपडेट