BMC Election Shiv Sena UBT: पॅचअप होणार की नडणार? मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, दोन आमदारांच्या वादाने ठाकरेंची डोकेदुखी वाढली!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena UBT Rebel Candidate : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी झाल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. मातोश्रीचे निकटवर्तीय असलेल्या दोन आमदारांच्या वादातून ही बंडखोरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांसमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान समोर आहे. शिवसेना ठाकरे गटाला बंडखोरीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी झाल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. मातोश्रीचे निकटवर्तीय असलेल्या दोन आमदारांच्या वादातून ही बंडखोरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे विभागात शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र आहे. विभाग प्रमुख आमदार अनिल परब यांच्याकडून जागावाटपाच्या वेळी माजी नगरसेवक वायंगणकर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती. मात्र, ऐनवेळी पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शास्त्री यांचं नाव पुढे रेटल्याने चित्र बदललं. अखेर शास्त्री यांनाच अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात तीव्र मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या वादानंतर अनिल परब रात्री उशिरा मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी अधिकच उघड झाली आहे.
दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शास्त्री यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी नगरसेवक वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे वांद्रे विभागात शिवसेनेच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतांचे विभाजन झाल्यास याचा थेट फायदा विरोधकांना होऊन अधिकृत उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
परब-सरदेसाईंची भेट, पॅचअप होणार?
या पार्श्वभूमीवर पक्षातील बंडखोरी थोपवण्यासाठी आणि ‘बंडोबा थंडोबा’ करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी समेटाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काल आमदार वरुण सरदेसाई यांनी अनिल परब यांची घेतलेली भेटही या प्रयत्नांचा भाग असल्याची चर्चा आहे. वायंगणकर हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, ही भेट नाराजी कमी करण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात कोणतेही वाद नाहीत, असा संदेश देण्याचाही प्रयत्न या भेटीतून करण्यात आला असावा, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता, या भेटीनंतर मातोश्रीच्या अंगणात झालेली बंडखोरी निवळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Shiv Sena UBT: पॅचअप होणार की नडणार? मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, दोन आमदारांच्या वादाने ठाकरेंची डोकेदुखी वाढली!










