Uddhav Thackeray: 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा अन् 'मातोश्री'वर हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत काय झालं?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली.
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी 'मातोश्री'वर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कमालीचे आक्रमक झाले असून, पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरे भेटत नाहीत आणि आदित्य ठाकरे फिरत नाहीत," अशी तक्रार करणाऱ्या खासदारांची रविवारी 'मातोश्री'वर चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. "ज्यांना सत्ताधाऱ्यांकडे जायचे आहे, त्यांनी आत्ताच सांगावे," अशा कडक शब्दांत ठाकरेंनी उपस्थित खासदारांना सांगितले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
advertisement
नाराजीचा सूर आणि 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा
काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. "उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही," अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वरिष्ठ नेत्यांसमोर वाचला होता. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत?" असा रोखठोक सवालही खासदारांनी विचारला होता.
advertisement
संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर रविवारी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत खासदारांची समजूत काढण्याऐवजी ठाकरेंनी थेट आक्रमक भूमिका घेतली. "जे सोबत राहतील त्यांनी पूर्ण निष्ठेने लढावे, अन्यथा ज्यांना सत्ताधाऱ्यांसोबत जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे," असे त्यांनी बजावले असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
राऊत-आदित्य वादावर अप्रत्यक्ष ओढले ताशेरे
राज्यसभा निवडणुकीपासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही खासदार राऊतांच्या गटाचे तर काही आदित्य ठाकरेंच्या गटाचे मानले जातात. या अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसू नये, यासाठीच ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही नेत्यांना वाद मिटवण्याचा सुप्त संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
advertisement
सरकारवर निधीवरून तोफ
दरम्यान, बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवींचा वापर करून कोस्टल रोडसारखे प्रकल्प उद्धव ठाकरेंनी उभे केले, मात्र आता भाजप पालिकेचे वाटोळे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, विरोधी खासदारांना केवळ ३ कोटी निधी दिला जातो, तर सत्ताधाऱ्यांना ८-८ कोटींची खिरापत वाटली जात असल्याचा भेदभावही त्यांनी बोलून दाखवला. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'मातोश्री'वरून थेट मोर्चेबांधणीचे आदेश देण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 9:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा अन् 'मातोश्री'वर हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत काय झालं?









