'शबासकी द्यायला पप्पा नाहीत', डोळ्यात पाणी अन् थरथरणारा आवाज, वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची लेक वैभवीला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. यानंतर तिने भावुक प्रतिक्रिया दिली.
बीड: आज सोमवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल लागला. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवीचा देखील समावेश होता. एकीकडे वडिलांची नराधमांनी केलेली हत्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सुरू असलेला आक्रोश... अशा मन सुन्न करणाऱ्या परिस्थितीत वैभवीनं बारावीची परीक्षा दिली होती. वडिलांच्या हत्येमुळे केवळ देशमुख कुटुंबच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. अशा स्थितीतही वैभवीनं परीक्षा दिली. तिने केवळ परीक्षाच दिली नाही, तर बोर्ड परीक्षेत घवघवीत यशही मिळवलं आहे.
वैभवीला बारावीच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना वैभवीला डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने घवघवीत यश मिळवले. वैभवीने बायोलॉजीमध्ये 98 गुण मिळवले. तर, फिजिक्समध्ये 83 आणि केमिस्ट्रीत 91 गुण मिळवले. गणितामध्येही वैभवीला 94 गुण मिळाले आहेत. वैभवीच्या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैभवी देशमुखनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाठीवर शबासकी द्यायला, पप्पा हयात नाहीत, अशी भावुक प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे.
advertisement
बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त करताना वैभवी म्हणाली की, "दु:ख याचं वाटतं की, माझ्या वडिलांच्या शबासकीची थाप माझ्या पाठीवर मिळणार नाही. त्यावेळी आमची मानसिकता वाईट होती. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. त्याच काळात महाराष्ट्रानं आम्हाला साथ दिली. थोडा अभ्यास करुन जेवढं शक्य झालं तेवढं केलं. आमचं डायरेक्शन वेगळं होतं. त्या घटनेनं आमचं आख्खं आयुष्य बदलून गेलं. आमचे विचारही बदलले.
advertisement
"माझ्या वडिलांना न्याय मिळणं, ही पहिली प्राथमिकता आहे. मी माझी 'नीट' परीक्षेची तयारी सुरू होती. नीट क्रॅक करावी, असं वाटतं होतं. मानसिकता नसतानाही पेपर दिला आणि स्कोअर खाली आला. त्या गोष्टींचा विचारही करावा वाटत नाही. गावकऱ्यांच्या आधारामुळे आम्ही आज इथे आहोत," असं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
May 05, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शबासकी द्यायला पप्पा नाहीत', डोळ्यात पाणी अन् थरथरणारा आवाज, वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया


