'शक्तिपीठ'साठी पैसे आहेत, मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे का नाही? वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव फेटाळला.
मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही, अशा शब्दात महायुती सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे का नाही? असा रोकडा सवालही वडेट्टीवारांनी केला.
निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली, मग आता समिती कशाला हवी?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कापसाला भाव मिळालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.
advertisement
माझ्या या बळीराजाला कृषिमंत्री भिकारी म्हणतो, माजी मंत्री त्याचा बाप काढतो, पण ह्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना त्याचं दुःख, वेदना जाणून घ्यावीशी वाटतं नाही. @INCMaharashtra pic.twitter.com/mmC2D8fNx8
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 2, 2025
नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही, सरकार काय करतंय?
advertisement
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका ६५ वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपलं. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
advertisement
अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शक्तिपीठ'साठी पैसे आहेत, मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे का नाही? वडेट्टीवारांचा हल्लाबोल