अवकाळीचे ढग द्राक्षांसाठी हानिकारक; मिलीबग, केवडा अन् भुरीचा धोका, अशी घ्या बागेची काळजी
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vineyard Care Tips: सध्या ढगाळ हवामानाचा द्राक्षांच्या बागांना मोठा फटका बसला आहे. या काळात विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने कांदा, तसेच खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता ऐन हिवाळ्यात पुन्हा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. त्यामुळे फळबागांना आणि विशेषत: द्राक्षबागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मिलीबग, केवडा आणि भुरी रोगांच्या प्रादुर्भावापासून द्राक्ष बागांची काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत सोलापूर कृषी विज्ञान केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी माहिती दिलीये.
advertisement
मिलीबग नियंत्रण
सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी मिलीबगचा प्रभाव वाढलेला दिसतोय. जर आपल्या द्राक्षबागेत मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्यासाठी जैविक पद्धतीने व्हर्टिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम, 5 मिली दूध प्रती मिली पाण्यातून फवारणी केली तर याचं व्यवस्थापन जैविक पद्धतीने होऊ शकतो. जर रासायनिक पद्धतीने याचा व्यवस्थापन करायचं असेल तर बुप्रोफ्रेझीन दीड लिटर पाण्यातून फवारणी केली पाहिजे.
advertisement
केवडा रोगाची लक्षणे
सध्या द्राक्ष बागांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फळछाटणी झाल्यापासून आतापर्यंत पाऊस झाला नसला, तरी बागेमध्ये मोठ्या प्रमाणात डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. केवडा रोगाच्या प्रादुर्भावासाठी आर्द्रता हा प्रमुख घटक आहे. ज्या बागांमध्ये घड लागले आहेत अशा ठिकाणी घडांमध्ये पाणी साठून राहते. त्यामुळे घडांमध्ये डाऊनीचे प्रमाण वाढते. पाऊस, सिंचन किंवा जास्त प्रमाणात दव पडण्यामुळे झाडाची पाने ओली होतात. त्यामुळे बागेत आर्द्रता वाढते. जीएची (जिबरेलिक ॲसिड) फवारणी किंवा डीपिंग झाल्यामुळे देखील घडांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते.
advertisement
केवडा रोग व्यवस्थापन
वेलींवर पडणाऱ्या दवामुळे घडांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे सकाळी द्राक्ष वेली हलवून पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. फळ छाटणीनंतर 30 ते 45 दिवसांच्या अवस्थेमध्ये द्राक्षवेलीवर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा. याव्यतिरिक्त डायमेथोमॉर्फ (50 टक्के डब्ल्यू.पी.) 0.50 ते 0.75 मिलि किंवा इप्रोव्हॅलीकार्ब (5.55 टक्के) अधिक प्रोपिनेब (61.25 टक्के डब्ल्यू.पी.) 2.25 ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) किंवा सायझोफॅमिड 0.2 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारणी करावी.
advertisement
भुरी रोगाचे लक्षणे
फळछाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो. पाने, कोवळी फूट या भागांवर रोगाची लागण होते. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर दमट हवामानामुळे बुरशीचे बीजाणू लवकर वाढतात. कमी ते मध्यम प्रकाश, 22 ते 28 अंश सेल्सिअस तापमान व दमट वातावरण भुरी रोगासाठी अनुकूल आहे. सध्याचे वातावरण हे भुरी रोगास अनुकूल आहे.पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.घडांवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. कालांतराने हे डाग काळसर होतात आणि घडाचा दर्जा पूर्णपणे ढासळतो.
advertisement
व्यवस्थापन - द्राक्षवेलीवरील कॅनॉपीच्या वाढीचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे. जेणेकरून प्रकाशसंश्लेषण योग्यरीत्या होऊन प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, द्राक्ष बागेची योग्य काळजी घेतल्यास जास्त उत्पन्न मिळू शकते. या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेची हिवाळ्यात काळजी घेतली तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळेल, असा सल्ला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख लालासाहेब तांबडे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 08, 2024 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अवकाळीचे ढग द्राक्षांसाठी हानिकारक; मिलीबग, केवडा अन् भुरीचा धोका, अशी घ्या बागेची काळजी








