Ram Mandir : रामलल्लांची वस्त्र पोहोचली अयोध्याला; महाराष्ट्रातील कन्येला शिवण्याचा मान Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
देवी-देवतांच्या मूर्तींना देखणे दागिने आणि तलम वस्त्र नेसविण्याची आपली प्रथा आहे. श्रीरामसाठी महाराष्ट्रातील कन्येनं वस्त्र शिवली आहेत.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
यवतमाळ : अयोध्येत काहीच दिवसात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. याचा आनंद भारतभरात बघायला मिळतोय. भारतभरातील रामभक्त आपापल्या परीने या सुवर्णानंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. देवी-देवतांच्या मूर्तींना देखणे दागिने आणि तलम वस्त्र नेसविण्याची आपली प्रथा आहे. अयोध्येत श्रीराम बालस्वरूपात असल्याने, त्यांची वस्त्र कशी असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. श्रीरामरायासाठी सुरेख रंगसंगतीची कपडे शिवण्याचे अर्थात रामलल्लासाठी ‘ड्रेस डिझायनिंग' करण्याची सुवर्णसंधी यवतमाळच्या कन्या सोनाली खेडकर यांना मिळाली आहे. त्यांनी तयार केलेली वस्त्र अयोध्यात पोहोचली आहेत.
advertisement
रामलल्लासाठी रेशमी कापडाची वस्त्र
मूळच्या यवतमाळ येथील असलेल्या सोनाली खेडकर या सध्या पुण्यात फॅशन डिझायनिंग व्यवसाय करत आहेत. पुण्यातील उद्योजिका आणि रामभक्त अनघा घैसास यांनी ‘दो धागे श्रीराम के नाम' या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं. तब्बल साडेबारा लाख रामभक्तांच्या हस्ते हातमागावर रामवस्त्रांसाठी रेशमी कापड विणल्या गेलं. या कापडाची वस्त्र डिझाईन करून शिवण्याची जबाबदारी अनघाताईंनी विश्वासाने सोनालीवर सोपविली. त्यांनी आधीदेखील सोनाली यांच्या कामाचा दर्जा आणि झपाटा पाहिलेला होता. सोनालीच्या हातून मर्यादीत वेळेत दर्जेदार काम होईल, हा त्यांचा विश्वास सार्थ ठरला.
advertisement
रामानेच दिली प्रेरणा, असा घडला किस्सा
वस्त्र शिवतांना 51 इंचाच्या मूर्तीच्या मापाचा हिशोब कसा घ्यावा? हा प्रश्न त्यांना पडला. पण जणू रामरायानेच त्यांना मार्ग दाखवला. एक दिवस त्यांच्याकडे एक कस्टमर आपल्या लहानशा मुलीसोबत आली. काय प्रेरणा झाली माहिती नाही पण,सोनाली यांनी त्या मुलीची उंची मोजली आणि ती अचूक 51 इंच होती. आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना होती. सर्व कारागिरांमध्ये उत्साह संचरला आणि प्रभू श्रीरामांचे आकर्षक वस्त्र तयार झाले, असं डिझायनर सोनाली यांनी सांगितलं.
advertisement
श्रद्धा भावनेने वस्त्र बनली
तब्बल दोन दशकांचा अनुभव पणाला लागला. त्यातून, रेशमी वस्त्राची उपरणं, सोवळं आणि अंगरखा अशा तीन कपड्यांचा एक सेट असे आठ सेट तयार करण्याचं ठरलं. देवावर श्रद्धा आणि मनात सात्त्विक भाव ठेवून काम सुरू केलं. थोडं संशोधन, अनुभव आणि कल्पना यातून राम लल्लाची वस्त्र घडली. रंगसंगती, जरीच्या काठांचं काम, कशिदाकारी, मोतीकाम करून रामललाच्या वस्त्रांचं सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला. एकूण आठ सेट आम्ही तयार केले आणि प्रत्येकाचा लूक वेगळा केला आहे, सोनाली यांनी सांगितले.
advertisement
मुस्लिम कारागीरांनी तयार केली वस्त्रे
हे काम सुरू असताना बुटीकमध्ये नवचैतन्य जाणवत होतं. ही वस्त्र रामरायाची असल्यामुळे पावित्र्य राखण्याचे प्रयत्न होते. स्वच्छतेची विशेष काळजी घेत निर्धारीत वेळेत वस्त्र शिवून पूर्ण केले. कशिदाकारी आणि मोतीकाम करणारे सगळे मुस्लिम कारागिर पण, कर्म हीच पूजा समजून त्यांनी जीव ओतून काम केलं. कपडे तयार झाले आणि ते देताना सगळे भावूक झाले. श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व सोहळ्यात यवतमाळच्या कन्येचं हे योगदान कौतुकास्पद आहे. यवतमाळ जिल्ह्यातही रामलाला ड्रेस डिजाइनर सोनाली आशिष खेडकर यांचे अभिनंदन होत आहे.
Location :
Yavatmal,Yavatmal,Maharashtra
First Published :
January 19, 2024 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Ram Mandir : रामलल्लांची वस्त्र पोहोचली अयोध्याला; महाराष्ट्रातील कन्येला शिवण्याचा मान Video