250 वर्षांची परंपरा असणारा घोराडचा पोळा, पाहा कसा होतो साजरा? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड येथील बैलपोळा प्रसिद्ध आहे. येथील पोळ्याला 250 वर्षांची परंपरा आहे.
वर्धा, 14 सप्टेंबर: विदर्भाची प्रति पंढरी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरेने बैलपोळा साजरा होतो. एक गाव एक पोळा अशी या गावची विशेष ओळख आहे. येथे बैलांचा व नंदीपोळा एकच भरत असतो. बैलांचा पोळा संत नामदेव महाराज समाधी मैदानावर तर नंदी पोळा हा विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर भरतो. अंदाजे 250 वर्षांपूर्वी संत केजाजी महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे.
कसा होतो पोळा साजरा?
बैलांचा पोळा हा संत नामदेव महाराज समाधी मैदानावर तर नंदी पोळा हा विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर भरतो. पोळा पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येतात. 250 वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा येथे कायम आहे. संत केजाजी महाराजांनी येथील पोळ्याची परंपरा सुरू केल्याचं सांगतिलं जातं. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संत नामदेव महाराज समाधी मैदान दुमदुमून जाते.
advertisement
ही आहे धार्मिक परंपरा
शेतकरी आपली बैलजोडी सजविल्यानंतर प्रथम विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर आणतो. मंदिरात असणाऱ्या शिव मंदिरातील नंदीला बेल पत्री वहिल्या जाते. त्यानंतर हनुमान मंदिरात पूजा करून बैल जोडीसह शेतकरी माता मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर आपली बैलजोडी घेऊन बोर तीरावरून मार्गक्रमण करीत पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन घेतले जाते. पुढे बैलजोडी संत नामदेव महाराज समाधी मैदानावर पोळ्यात उभी करतात.
advertisement
मशाल पेटवून पोळ्याची सांगता
सायंकाळी 4 वाजता मंदिरातून भजनी दिंडी टाळ मृदंगाचा निनाद करीत पोळा स्थळी येते. यात शेतकरी नागरिक सहभागी होतात. ही दिंडी पोळ्यात असणाऱ्या बैलजोडीच्या रांगांना पाच प्रदक्षिणा घालतात. मंदिराचे पुजारी पोळ्यात असणाया पाच बैलजोडींची पूजा करतात. त्यानंतर संत नामदेव महाराज समाधी येथे आरती होते. या नंतर मशाल पेटवून पोळ्याची सांगता होते. दिंडी विठ्ठल रखुमाई मंदिरात परत येते, ही येथील धार्मिक परंपरा आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 14, 2023 6:53 PM IST