लाकडी नंदीची निघतेय मिरवणूक, 150 वर्षांची परंपरा असणारा तान्हा पोळा माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जातो. पण इथल्या पोळ्याला 150 वर्षांची परंपरा आहे.
वर्धा, 10 सप्टेंबर: बैलपोळा हा कृषी संस्कृतीशी संबंधित असणारा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विदर्भात हा पोळा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेचा मोठ्या बैलांचा तान्हा पोळा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या पोळ्याला 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. पिढया न पिढ्या हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सिंदी शहराला ‘पोळा सिटी’ अशी नवी ओळख निर्माण होत आहे.
सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा
वर्धा येथील सिंदी रेल्वे येते तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. डीजे आणि ढोलताशांच्या निनादात ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई करून नंदी बैल ऐटीत बाजार चौकात येतात. यात जयस्वाल यांचा मानाचा नंदी असतो. येथे निघणाऱ्या झाकी मध्ये हा नंदी आल्याशिवाय इतर नंदी निघत नाहीत. त्यामागे कित्येक वर्षांची परंपरा आहे.
advertisement
काय आहे मानाच्या नंदीची परंपरा?
जयस्वाल यांच्याकडील नंदी अखंड लाकडापासून निर्मित झाला आहे. अंदाजे 150 वर्षांपासून हा नंदी तयार झाला असल्याचं सांगितलं जातं. सुरवातीला नंदीचे पूर्वीचे मालक जयस्वाल यांनी हा नंदी तयार करून घेतला होता. जयस्वाल यांचं घर माधवी जयस्वाल यांच्या सासऱ्यांनी विकत घेतलं. तेव्हापासून या नंदीची जवाबदारी देखील घेतली असल्याचं त्या सांगतात. 44 वर्षांपासून माधवी जयस्वाल आणि त्यांचे कुटुंबीय ही परंपरा जपत आहेत. त्याआधी भोई पुरा येथील नागरिक मिरवणूक काढायचे. या सिंदी रेल्वेच्या तान्हा पोळ्याच्या परंपरेला तब्बल 141 वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातं.
advertisement
त्यानंतर बांधले नंदीचे मंदिर
एका वर्षी मिरवणूक संपेपर्यंत पहाटे 3 वाजले. त्यानंतर हा नंदी ट्रॅक्टर मध्येच उन्हात राहिला. त्या वर्षी माधवी जयस्वाल यांच्या एक नणंद पोळ्याला सिंदीत आल्या नव्हत्या. तेव्हा माधवी जयस्वाल यांच्या नणंदेच्या स्वप्नात येऊन नंदीने मला उन्हात ठेवले असल्याची अनुभूती दिली. त्यानंतर नंदीला उन्हातून ट्रॅक्टर मधून खाली उतरवून स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निर्णय जाला. आता नंदीला वर्षभर मंदिरात ठेवण्यात येते. विदर्भात लाकडी नंदीचे हे पहिलेच स्वतंत्र मंदिर असू शकते असेही माधवी जयस्वाल सांगतात.
advertisement
पोलिसांचा असतो चोख बंदोबस्त
नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवली जाते. हा ऐतिहासिक पोळा पाहण्यासाठी सिंदीवासीय सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतात. या दिवशी गावात प्रत्येक घरी पाहुणा हा सोहळा पाहण्यासाठी हजर असतो.
सिंदी शहराला येते जत्रेचे स्वरूप
पोळा सणाची एक महिन्यांपासून आतुरतेने सिंदीवासी वाट पाहतात. तान्हा पोळ्यासाठी 4 ते 5 दिवसांपासून सिंदी गाव सजविण्यात येते. सायंकाळी 40 ते 50 हजार लोकांच्या उपस्थितीत पोळा सण साजरा केला जातो. मोठा भव्य मेळा ही भरतो. सिंदी शहरातील या तान्हा पोळ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. हा उत्सव साजरा होत असताना अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस तैनात असतात. दरवर्षी तान्हा पोळ्याला संपूर्ण सिंदी गाव एकत्रित येऊन आपल्या गावाची परंपरा जपत आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 10, 2023 2:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
लाकडी नंदीची निघतेय मिरवणूक, 150 वर्षांची परंपरा असणारा तान्हा पोळा माहितीये का?